आवताडेंच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस सात सभा घेणार, भाजपाने अनेक स्टार प्रचारक पोटनिवडणुकीत उतरविले

पंढरपूर- सरत्या आठवड्यात दोन दिवस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचारार्थ पंढरपूर दौर्‍यावर आले होते आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ १२ व १३ एप्रिल असे दोन दिवस येथे येत आहेत. ते सात सभा दोन तालुक्यात घेणार आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असला तरी येथे राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीचा उत्साह कमी झालेला दिसत नाही. प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतीय जनता पक्षाने ही जागा जिंकण्याचा चंग बांधला असून यासाठी येथे मागील दोन निवडणुका एकमेकांविरोधात लढलेल्या परिचारक व आवताडे यांना पक्षाने एकऋ आणले आहे व मंगळवेढ्याचे समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपाने आवताडे यांच्यासाठी येथे ताकद पणाला लावली आहे. त्यांच्या प्रचारासाठी अनेक दिग्गजांना येथे पाचारण करण्यात आले आहे. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे प्रचाराची धुरा आहे तर आमदार प्रशांत परिचारक हे आवताडे यांच्यासोबत सावलीप्रमाणे साथ करत प्रचारात उतरले आहेत. धनगर समाजाचे या मतदारसंघात असलेले प्राबल्य पाहता आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री राम शिंदे यांच्या सभा मंगळवेढ्यात घेण्यात आल्या आहेत. याच बरोबर शेतकरी नेते व रयत क्रांतीचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांनी येथे प्रचार सभा घेतल्या आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इडियाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पंढरपूर व मंगळवेढ्यात पक्षाच्या बैठका घेत आवताडे यांच्यासाठी प्रचार केला आहे.
ही निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची केली असून आजवर या भागात विधानसभेला कधीही कमळ न फुलल्याने यंदा इतिहास रचण्याचा इरादा त्यांचा दिसत आहे. यासाठीच स्टार प्रचारकांची फौजच येथे तैनात आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे प्रचारात उतरले होते मात्र त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने ते प्रचारापासून दूर राहिले आहेत मात्र माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी येथे हजेरी लावली आहे. भाजपाचे निरीक्षक बाळा भेगडे , माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, सुभाष देशमुख , जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह अनेक नेते प्रचारात गुंतले आहेत. प्रदेशचे प्रवक्ते केशव उपाध्ये हे पंढरीत मुक्कामी असून माध्यमांमध्ये ते पक्षाची बाजू मांडत आहेत तर आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी ही आवताडे यांच्या प्रचारासाठी पंढरी गाठली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुरूवातीलाच येथे हजेरी लावली होती. आता भाजपाचे राज्याचे नेतृत्व करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर दौर्‍यावर येत असून ते मंगळवेढा तालुक्यात शहरासह बोराळे, नंदेश्‍वर, डोंगरगाव तर पंढरपूर शहरासह शेजारच्या गादेगाव व कासेगावात तीन सभा घेणार आहेत. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात फडणवीस यांनी आवताडे यांच्या प्रचारासाठी दोन दिवस येथे देवू केले आहेत. यामुळे सहाजिकच भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!