ज्ञानेश्वरी म्हणजे मराठी सारस्वतातील अनमोल ठेवा

श्री क्षेत्र आळंदी दि . १४ – ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी म्हणजे मराठी सारस्वतातील अनमोल ठेवा आहे . आजच्या तरुण पिढीने तो जपायला हवा . याचसाठी संयोजकांनी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे फेसबुकद्वारे निरुपण हा उपक्रम हाती घेतला असावा असे मत पाथर्डी (जि. अहमदनगर) मठाचे मठाधिपती ह. भ. प. जगन्नाथ महाराज गर्जे – शास्त्री यांनी व्यक्त केले .
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , श्री क्षेत्र आळंदी , महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ व माय एफएम इंडिया रेडिओ यांच्या वतीने आषाढी वारीनिमित्त ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे निरुपण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . आज ( रविवार ) सांख्ययोग या दुसऱ्या अध्यायाचे निरुपण करताना गर्जे – शास्त्री महाराज यांनी अध्यायावर चिंतन केले .

गर्जे – शास्त्री महाराज म्हणाले , अखिल विश्वाच्या मांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून संबंध मानव जातीचा उद्धार व्हावा म्हणून संबंध जातीपातीतील लेकरांना माझं म्हणणारी व त्यांना संतत्व प्रदान करणारी एकमेव माउली म्हणजे ज्ञानोबाराय.
ज्ञानोबारायांच्या जीवनातील समाजोपयोगी घटक म्हणजे त्यांचं वाड्मय. या मराठी सारस्वतातील अनमोल ठेवा म्हणजे ज्ञानोबारायांचं वाड्मय आणि या वाड्मयाचा प्राण म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. मराठी साहित्यातून ज्ञानेश्वरी बाजूला केली तर मराठी साहित्य निष्प्राण होईल. ज्ञानेश्वरी हा एक स्वयंभू आणि परिपूर्ण ग्रंथ आहे. या एकाच ग्रंथाचा आश्रय घेतला तर जगात कुठल्याच ग्रंथाकडे पाहण्याची आवश्यकता नाही. असा वैभव संपन्न ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी होय. ज्ञानेश्वरी गीतेवरील टीका जरी असली तरी गीतेपेक्षा कमी नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, जास्तच बारकाईने अभ्यास केला तर गीतेवरती ज्ञानेश्वरी टीका आहे की ज्ञानेश्वरीवरती गीता टिका आहे याचा मेळ लागणार नाही.

कवण भूमी हे न चोजणे I

असा समरस ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी.

ज्ञानोबाराय म्हणतात, आणखी काय सांगू गीतेला ही कमीपणा आणण्याची ताकत माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे.

ना मोकळे तरि उणे I
गीता ही आणित II

ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायाची महती वेगवेगळी आहे. परंतु दुसरा अध्याय हा सांख्ययोग आहे. या अध्यायामध्ये कर्तव्यापासून परान्मुख झालेल्या अर्जुनाला भगवंत स्वकर्म करायला लावतात. अर्जुन म्हणत होता की देवा स्वजनांना कसं मारायचं? आचार्य मंडळी आहेत, त्यांना मारून यांच्या रक्ताने माखलेले भोग आपण भोगायचे?

ते मना नये आघवे I जिवीलेसी II

अरे मारण्यापेक्षा सरळ भिक्षा मागून जगलेलं बरं.

हे असू येथवर भिक्षा I मागता भली II

परंतु भगवंत अर्जुनाला समजावून सांगतात, बाबा अर्जुना, देह हा नाशिवंत आहे. तू आत्म्याला पहा. तो कधी नाश पावत नाही. आत्मा कुणाला मारतही नाही आणि मरतही नाही. तसेच युद्ध करणं हा तुझा धर्म आहे. जो तुला तारणारा आहे. तू क्षत्रिय आहेस म्हणून क्षत्रिय वृत्तीत युद्ध केलस तर तुला पाप नाही. हा स्वजनांचा मोह टाकून दे. या युद्धजन्य परिस्थितीमध्ये हा हिताचा नाही.

तुज नव्हे हे उचित I
येणे नासेल जोडले बहुत II

39 व्या श्लोकापर्यंत भगवंत सांख्ययोग सांगतात व नंतर कर्मयोगातील सद्बुध्दी अर्जुनाला सांगतात की, निष्काम भावनेने कर्म करण्याची बुद्धी म्हणजे सद्बुध्दी आहे. ही सद्बुध्दी थोडी जरी असली तरी संसार भयांचा नाश करते. परंतु दुसरी जी आहे ती दुर्बुध्दी आहे. ती अविवेकी पुरूषाच्या ठिकाणी राहते. विषय भोगामध्ये आसक्ती ठेवते पण तू सुबुध्दीने कर्म कर. फक्त कर्म करण्यातच तुझा अधिकार आहे. फळाचा विचार करू नको. कर्म पूर्णत्वाला गेले तरी हर्ष होऊ देवू नको व अपूर्ण राहिले तरी खेद वाटू देवू नको. कर्माच्या परिणामाचा विचार करू नको. कर्माच्या बाबतीत मनाचा समतोल राख आणि फळाचा विचार न करता कर्म कर.
अशाप्रकारे गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील विषय हा तरूणाईसाठी अतिशय महत्वाचा आहे. अर्जुन गुरूजनांबद्दल, मोठ्यांबद्दल जो आदर दाखवतो तो आज कुठेतरी तरूणांच्या ठिकाणी आसणं महत्वाचे आहे. भगवंताने जो उपदेश अर्जुनाला केला की, अर्जुना या जगात करण्यासाठी खूप काही आहे पण तुझ्यासाठी योग्य काय आहे ते कर. हा विचार तरूणांच्या ठिकाणी असावा. आधी आपण कोण आहोत हे स्वत:ला जाणून घ्यावं आणि आपल्या अधिकारानुसार आपलं कर्तव्य करावं. हा विषय जीवनामध्ये अतिशय महत्वाचा आहे. या अध्यायात सद्बुध्दी आणि दुर्बुध्दी याचा विचार भगवंतांनी अतिशय गोड मांडलेला आहे. दुर्बुध्दी जीवन उध्वस्त करते व सद्बुध्दी जीवन सन्मार्गाला लावते. त्यामुळे तरूणांनी सद्बुध्दीचा नेहमी आश्रय घ्यावा व स्वत:च्या वाट्याला आलेले कर्म निष्काम भावनेने करावे हा आजच्या तरूणांसाठी या अध्यायातील प्रमुख उपदेश आहे असे ते म्हणाले . या कार्यक्रमाचे निवेदन ह. भ.प. स्वामीराज महाराज भिसे यांनी केले .
सोमवार दि . १५ जून रोजी सिन्नर जि नाशिकचे ह भ. प. किशोर महाराज खरात हे तिसऱ्या अध्यायावर सायंकाळी ४ वाजता निरुपण करणार आहेत .

आज ( रविवार ) पहाटे आजोळघरी श्री माऊलींची पूजा व आरती देवस्थानचे माजी व्यवस्थापक सुधीर गांधी व सुरेश गांधी यांच्या हस्ते करण्यात आली . पुजेचे पौरोहित्य यज्ञेश जोशी व राहूल जोशी यांनी केले . दुपारी माउलींना नैवेद्य दाखविण्यात आला . रात्री खडकतकरांच्या वतीने जागराची सेवा करण्यात आली .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!