पंढरपूरमध्ये रविवारी रॅपिड टेस्टमध्ये    110 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले

पंढरपूर, दि.9 – येथे संचारबंदीची कडक अंमलबजावणी केल्यानंतर प्रशासनाच्या वतीने शहर व तालुक्यात जेथे कोरोनाबाधित रूग्ण जास्त प्रमाणात आढळून आले आहेत तेथे रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात येत आहेत. चेस द व्हायरस या उपक्रमाअंतर्गत रविवारी 513 टेस्ट करण्यात आल्या असून यात 110 इतके कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. 403 निगेटिव्ह आहेत.

शुक्रवारपासून रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टची संख्या शहरासह आजुबाजूच्या भागात वाढविण्यात आली होती. शुक्रवारी 84 रूग्ण तर शनिवारी 114 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. आज रविवार 9 ऑगस्ट रोजी 513 टेस्ट झाल्या असून यातून 110 रूग्ण आढळल्याची माहिती मिळाली आहे.

आज पंढरपूर शहरात उपजिल्हा रूग्णालयात, निदान , रोहन, निष्कर्ष लँब, ल.टाकळी, mnp ओपिडी, कासेगाव, करकंब येथे चाचण्या झाल्या.
शहरातील प्रभाग क्रमांक चार व पाच येथे 250 टेस्ट झाल्या होत्या. येथे प्रशासन व स्थानिक नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील नागरिकांनी रॅपिड टेस्टला चांगला प्रतिसाद दिला आहे. या कॅम्पला प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर याच बरोबर वैद्यकीय अधिकारी तसेच माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांनी भेट देवून पाहणी केली. याच बरोबर ग्रामीण भागात ही अनेक ठिकाणी शिबिर घेण्यात आली आहेत. लक्ष्मी टाकळी या गावात कोरोनाचे यापूर्वी अनेक रूग्ण आढळून आले असून तेथे देखील रविवारी रॅपिड अन्टीजेन टेस्ट घेण्यात आल्या आहेत. यासाठी तेथील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके हे ग्रामीण भागात जास्तीत नागरिकांच्या टेस्ट करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
दरम्यान पंढरपूर नगरपरिषदेने लक्षण नसलेले व अति सौम्य लक्षण असलेल्या कोरोनाबाधितांना आपल्या घरीच राहून उपचार घेण्याची परवानगी दिल्याने टेस्टला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्यांच्या घरी स्वतंत्र शौचालय व रूमची व्यवस्था आहे त्यांना घरीच आयसोलेशनमध्ये राहता येत असल्याने कालपर्यंत 48 हून अधिक रूग्ण हे घरीच राहून उपचार घेत आहेत. दरम्यान मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी पंढरपूरकरांना आवाहन करताना स्पष्ट केले की, कोणतीही शंका मनात उपस्थित न करून घेता नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करून घ्यावी. जेणे करून जे लोक बाधित आहेत त्यांना अलगीकरणात ठेवून उपचार करणे सोपे जावू शकते. 6 ऑगस्टपासून नगरपरिषदेने लक्षण नसलेले अथवा सौम्य लक्षण असणार्‍यांना घरीच उपचार घेण्याची मुभा दिली आहे. यासाठी रूग्णासाठी स्वतंत्र रूम व शौचालय घरी असणे बंधनकारक आहे.

दरम्यान पंढरपूर शहरात सात दिवस लॉकडॉऊन पुकारण्यात आला असल्याने प्रशासनाच्या वतीने गोरगरीब व गरजूंसाठी मोफत भोजनाची सोय करण्यात आली असून एकावेळी किमान सातशे ते आठशे लोक याचा लाभ घेत असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. रॉबिनहूड आर्मीचे स्वयंसेवक हे बसस्थानक तसेच अन्यत्र गरीबांना भोजन पोहोचविण्याचे काम करत आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!