पंढरपूर– पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना पाठिंबा दिला असून त्यांचा प्रचार सुरू केला आहे. दरम्यान पक्षाची याबाबतची अधिकृत भूमिका सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
एखाद्या मतदारसंघात लोकप्रतिनिधीचे जेंव्हा निधन होते तेंव्हा पोटनिवडणूक जाहीर होते. यात जर पक्षाने दिवंगत लोकप्रतिनिधीच्या कुटुंबात उमेदवारी दिली तर तेथे निधन झालेल्या नेत्याला श्रध्दांजली म्हणून त्यांच्या घरच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मनसेची नेहमीच भूमिका राहिली आहे. पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार कै. भारत भालके यांचे नुकतेच निधन झाले व राष्ट्रवादीने येथे त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे येथे मनसे भगीरथ यांच्या पाठीशी राहिल असे दिलीप धोत्रे यांनी सांगितले. याच बरोबर मतदारांनीही कै. भारत भालके यांना श्रध्दांजली म्हणून भगीरथ यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान दोनच दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे जेंव्हा पंढरीत भालके यांच्या प्रचारासाठी आले होते तेंव्हा त्यांनी दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी जावून त्यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्याचवेळी धोत्रे हे भालके यांच्या पाठीशी राहतील असा अंदाज व्यक्त होत होता. दरम्यान मागील निवडणुकीत मनसेने कै. भारत भालके यांची साथ केली होती.