पवारांचे माळशिरस तालुक्यावर लक्ष, केला मदतीचा हात पुढे
पंढरपूर – माळशिरस तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रास खासदार सुप्रिया सुळे,आमदार रोहित पवार यांच्या शिफारशीनुसार 18 ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर मिळाले असून यापूर्वी माळशिरस, पंढरपूर व सोलापूरसाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्हेंटिलेटर बायपॅप मशीन देवू केल्या होत्या. राजकारणात पुढे येणारे युवा नेते सामाजिक जबाबदारीचे भान राखून काम करत असल्याचे हे चित्र सकारात्मक वाटत आहे.
कोरोना संसर्गाच्या काळात अनेकांनी रूग्णांच्या मदतीसाठी हात पुढे केले आहेत. अनेक संघटना यासाठी काम करत आहेत. यात राजकारणी मंडळीही मागे नाहीत. नीलेश लंके या आमदारांनी तर कोरोनाग्रस्तांसाठी केलेले काम सारे राज्य जाणतो आहे. अशी स्थिती अनेक ठिकाणी आहे. यात राजकारणातील तरूण पिढी मागे नाही. नुकतेच राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे व आमदार रोहित पवार यांनी माळशिरस तालुक्यातील रूग्णालयात 18 ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर मशीन मिळवून दिल्या आहेत.
कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेत अनेकांना ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागला असून यातच आता तिसर्या लाटेची शक्यता वर्तवली जात असून यामध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे ही लाट येण्यापूर्वीच नियोजन केले जाणे आवश्यक आहे.
माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना शासकीय रूग्णालयांमध्ये विनाखर्च उपचार मिळावेत व यासाठी सर्व यंत्रणा ही आवश्यक असल्याने रोहित पाटील या सामाजिक कार्यकर्त्याने यशवंतनगर, पिलीव, वेळापूर, माळशिरस ग्रामीण रुग्णालय, अकलूज उपजिल्हा रुग्णालय, नातेपुते रुग्णालय येथे ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर आणि व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावेत यासाठी खासदार सुप्रिया सुळे व आमदार रोहित पवार यांच्याकडे मागणी केली होती. याची दखल घेत त्यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त यांना सूचना केल्या. यानंतर आता अकलूज, नातेपुते, माळशिरस व प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरनगर, वेळापूर,पिलीव या ठिकाणी 18 ऑक्सिजनची कॉन्सेट्रेटर देण्यात आले आहेत. नुकतेच कर्जत येथे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले.