पवारांवरील टिकेवर फडणवीसांची तातडीने सारवासारव उगाचच नाही…

प्रशांत आराध्ये

भाजपाचे तरूण आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पंढरपूरमध्ये जी बेताल टीका केली यानंतर तातडीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरमध्ये याबाबत स्पष्टीकरण दिले व सारवासारव करत अशी टीका मान्य नसल्याचे स्पष्ट केले. फडणवीसांनी तातडीने यावर प्रतिक्रिया देण्यामागे बरीच कारणं आहेत. ज्या ज्या वेळी भाजपाने पवारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे त्या त्या वेळी याचा फायदा राष्ट्रवादीला पर्यायाने शरद पवार यांना झाला आहे. या घडीला तर देश कोरोना महामारीच्या महासंकाटातून जात असून केंद्रापासून ते राज्यापर्यंत सर्वच सत्ताधार्‍यांना विरोधकांची आणि विरोधकांना सत्ताधार्‍यांच्या मदतीची गरज आहे.

विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांना टार्गेट करण्यासाठी भाजपाने अनेक हातखंडे आजमावले होते. शिखर बँक ईडी प्रकरण तर फारच गाजले होते. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवार यांनी आपल्या अनुभवी राजकारणाच्या जोरावर याचे बुमरँग तत्कालीन सत्ताधार्‍यांवर उलटविले होते. विधासभा निवडणुकीच्या प्रचारात तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांचे राजकारण संपले आहे अशी टीका सुरू केली होती. आपणच पुढचे मुख्यमंत्री असल्याची स्वयंघोषणा करत फडणवीस हे सतत मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन.. अशी वल्गना करत होते. मात्र पवार हे पन्नास वर्षाहून अधिक काळ राजकारणात मुरले आहेत त्यांनी टिकेकडे दुर्लक्ष केले व दोन्ही काँगे्रसच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेत शंभर जागा जिंकून आणल्या… आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शिवसेनेला बरोबर घेवून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. ज्या शिवसेनेला भाजपापेक्षा कमी जागा मिळतात म्हणून युतीत मुख्यमंत्रिपदापासून दूर रहावे लागत होते त्याच पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनाच मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्यासाठी पवारांनी गळ घातली आणि शपथविधी झाला.

सत्तास्थापनेच्या काळात फडणवीस यांनी तयार होणारी महाविकास आघाडी सत्तेपर्यंत पोहोचण्याआधीच यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला व अजित पवार यांना बरोबर घेत 78 तासाचे सरकार स्थापन करून पाहिले मात्र शरद पवार यांनी सहजपणे हा प्रश्‍न सोडविला व अजितदादा पुन्हा स्वगृही परतले. यामुळे भाजपाचे देशभरात हासे झाले होते. यामुळे जेंव्हा जेंव्हा पवारांविरोधात भाजपा रान उठविण्याचा प्रयत्न करते तेंव्हा तेंव्हा त्यांना अपयशच येत आहे. यामुळेच आमदार पडळकर यांनी पवार यांच्यावर जी बेताल टीका केली याचे समर्थन फडणवीस करू शकले नाहीत उलट त्यांनी हे योग्य नसल्याचे सांगत शरद पवार हे आपले शत्रू नाहीत राजकीय विरोधक असल्याची जाणीव करून स्वपक्षीयांना करून दिली.

राज्यात राष्ट्रवादीचे व भाजपाचे पटत नसले तरी केंद्रातील नेत्यांमध्ये चांगला समन्वय असल्याचे आजवर दिसून आले आहे. मध्यंतरी गलवान खोर्‍यातील भारत- चीन तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलाविल्या सर्वपक्षीय बैठकीत शरद पवार यांनी केेंद्र सरकार जी पावले उचलेल यास समर्थन जाहीर केले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना ही सात महिन्यापूर्वी मोदी आणि पवार यांची दिल्लीत भेट झाली होती. यासह विविध प्रश्‍नांवर नेहमीचे हे दोन्ही नेते एकमेकांशी बोलतात. मध्यंतरी कोरोनामुळे राज्यातील परप्रांतीय मजूर जेंव्हा स्वगृही जाण्यासाठी धडपडत होते तेंव्हा रेल्वेगाड्यांवरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यात शाब्दिक व ट्विटर वाद पाहावयास मिळाला होता. तेंव्हा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी गोयल यांच्या कामाची प्रशंसा केली होती. यामुळे भाजपा व राष्ट्रवादीच्या केंद्रीय नेत्यांमध्ये चांगले संबंध असल्याचे दिसून येते.

भाजपा देशातील सर्वच राज्यात आपली सत्ता असावी अशी आशा बाळगून आहे. महाराष्ट्र हातून गेल्याचे दुःख केंद्रीय नेत्यांना असणार मात्र एका बाजूला भाजपाला केंद्राच्या सत्तेपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक वर्षे मदत करणारी शिवसेनाच सध्या विरोधी पक्षांबरोबर राज्याच्या सत्तेत पोहोचली आहे. उध्दव ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री आहेत. दुसरीकडे शरद पवार ज्यांचे थेट पंतप्रधान मोदी यांच्याशीच चांगले संबंध आहेत व आजवर त्यांची मैत्री देशाने पाहिली आहे तेच या महाविकास आघाडीचे मार्गदर्शक असल्याने येथे भाजपाला मध्यप्रदेशसारखा करिष्मा दाखविता येणे थोडे अवघड आहे. समजा जरी येथे याच पंचवार्षिकला भाजपाला काही समीकरण जुळवत सत्ता मिळविण्याचा योग आले तरी शिवसेना अथवा राष्ट्रवादी शिवाय पर्यायही नाही. यामुळे एखाद्या आमदाराने शरद पवार यांच्यावर जहरी टीका करून विनाकारण वाद निर्माण केला तर तो भाजपाला परवडणारा नाही. कारण गेल्या काही वर्षांत पवारांवरील टीका नेहमीच भाजपाला राज्यात महागात पडली असल्याचे देवेंद्र फडणवीस जाणून आहेत , म्हणूनच त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करून सारवासारव केली असणार हे निश्‍चित. कारण राज्यातील राजकारणावर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे ही लक्ष असणारच…

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!