पुन्हा माढ्यात पवार लाओ.. संघर्ष भगाओ


लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा माढा मतदारसंघ हॉटस्पॉट बनला असून येथील राष्ट्रवादीमधील अंतर्गत चुरस पाहता पुन्हा खासदार शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील बैठकीत राष्ट्रवादीमधील नेत्यांनी पवार साहेबांना पुन्हा आपणच माढ्यातून निवडणूक लढवावी असा आग्रह केल्याने आता कदाचित 2019 च्या लोकसभेचे उमेदवार पुन्हा शरद पवार असू शकतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. येथील अंतर्गत संघर्षावर कदाचित हाच जालीम उपाय असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीचा राज्यात सर्वाधिक प्रभाव हा पश्‍चिम महाराष्ट्रात असून येथे पक्षाच्या वाटणीला येणार्‍या जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये विजयी करण्याची रणनीती पवार यांच्याकडून आखली जात आहे. कोल्हापूर व सातारा येथील राष्ट्रवादीमधील अंतर्गत धुसफूस कमी करण्यासाठी व लोकसभा जागा राखण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आहेत. सातार्‍यात जावून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील मतभेद कमी करण्यासाठी ते स्वतः सातार्‍यात दाखल झाले होते. बारामती मतदारसंघ हा घरचा असल्याने पवार यांना त्या जागेची काळजी नसते परंतु आता माढा, मावळ व पश्‍चिम महाराष्ट्रातील अन्य जागांबरोबर उस्मानबाद साठी त्यांनी खास रणनीती आखली असल्याचे कळते.
माढा मतदारसंघातून 2014 ला विजयी झालेले खासदार विजयसिंह मोहिते पाटील हेच राष्ट्रवादीचे 2019 चे उमेदवार असतील अशी चर्चा होती परंतु त्याला पहिला छेद बसला तो सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या उमेदवारी मागणीने. यापाठोपाठ जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी ही माढ्याच्या जागेवर हक्क सांगितला. आणि यानंतर खर्‍या अर्थाने चर्चा सुरू झाली. माढ्याचा तिढा पुन्हा राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरू लागला. येथे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे व जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांची भूमिका महत्वाची आहे तसेच अन्य मतदारसंघातील सर्वपक्षीय नेते हे शरद पवार यांच्याशी संबंधित आहेत आणि रिंगणात जर साहेब स्वतः उतरणार असतील ते जोमाने कामाला लागतात हा अनुभव आहे.
पुण्यातील बारामती वसतिगृहात झालेल्या बैठकीत सर्वच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांनी माढ्यातून लढावे अशी मागणी केली आहे. या बैठकीस ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील,खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. पवार यांनी आपणास निवडणूक लढविण्याची इच्छा नसल्याचे सांगितले आहे. परंतु पवार कधी कोणता निर्णय घेतील हे सांगता येत नाही.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!