महाआघाडीमुळे शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीत उत्साह, भाजपाचे कार्यकर्ते चमत्काराच्या आशेवर

पंढरपूर-  परंपरागत काँग्रेसी विचारसरणीबरोबर राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यात सध्या दोन्ही काँग्रेस व शिवसेनेत महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेच्या तयारीने उत्साहाचे वातावरण असले तरी भाजपाच्या कार्यकर्त्यांना अद्याप आपल्या वरिष्ठ नेतृत्वाकडून चमत्कार घडू शकतो अशी आशा आहे.शुक्रवारी महाविकास आघाडीच्या तीन ही घटक पक्षांनी सकरात्मक भूमिका घेत सत्तास्थापनेची तयारी पूर्ण केली तर  अन्य लहान मोठ्या घटक पक्षांना ही विश्‍वासात घेतल्याने आता शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार व या सरकारमध्ये दोन्ही काँग्रेस सहभागी होणार हे निश्‍चित झाल्याने आता शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राज्यात शिवसेनेला बरोबर घेवून भाजपा मोठा  पक्ष बनला यामुळे शिवसेनेचे मुख्यमंत्रिपद मिळविण्याचे स्वप्न सत्यात उतरणे अवघड बनत होते मात्र यंदा कणखर भूमिका घेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेस बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे.सोलापूर जिल्हा हा काँगे्रसच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभा राहिला आहे. येथे सध्या राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. यंदा ही तीन आमदार या पक्षाचे विजयी झाले असून एक अपक्ष राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर विजयी झाला आहे. राज्यात भाजपा व शिवसेनेला बहुमत असल्याने युतीचे राज्य येईल असे चित्र असताना आता अचानक शिवसेना दोन्ही काँंग्रेसबरोबर सत्ता स्थापन करत असल्याने जिल्ह्यातील दोन्ही काँगे्रस जनांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पाच वर्षे सत्तेपासून आघाडी दूर होती मात्र आता पुन्हा सत्तेची चव चाखण्यास मिळणार असल्याने दोन्ही काँग्रेसच्या आमदार समर्थकांमध्ये उत्साह आहे. येथून मंत्रिपदाची कोणाला संधी मिळणार यावर ही चर्चा रंगत आहेत. शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्यात सांगोल्याचे अ‍ॅड. शहाजीबापू पाटील हे एकमेव आमदार आहेत.

शरद पवार सत्तास्थापनेत व्यस्त, सोलापूर जिल्हा दौर रद्द

पंढरपूर–  राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे सध्या राज्यात महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेत व्यस्त असल्याने शनिवार 23 रोजीचा त्यांचा सोलापूर जिल्हा दौरा रद्द झाला असून ते मंगळवेढा व मोहोळ येथे पुढील काही दिवसात कार्यक्रमांना येणार आहेत. याबाबतच्या तारखा नंतर निश्‍चित केल्या जाणार आहेत.पवार हेच महाविकास आघाडीचे प्रवर्तक असून नवी दिल्ली व मुंबईत त्यांच्या उपस्थितीत ही आघाडी सत्तास्थापनेची तयारी करत आहे. शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादी या तीन पक्षांचे सरकार राज्यात येत्या काही दिवसात अस्तित्वात येणार आहे. याबाबतच्या बैठका सध्या रोज होत असल्याने शरद पवार यांना वेळ नसल्याने शनिवारचा त्यांचा सोलापूर जिल्हा दौरा करण्यात आला आहे. मंगळवेढा येथे पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचा सत्कार ठेवण्यात आला होता तसेच मोहोळमध्ये ही सत्काराचे आयोजन होते. यासाठी ते शनिवार 23 रोजी येथे होणार होते. मात्र आता सत्तास्थापनेचा मुहूर्त जवळ येत असल्याचे संकेत मिळत आहेत व यामुळेच पवार यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. मात्र तेे लवकरच या दोन्ही तालुक्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!