अकलूजचा आदर्श राज्यातील डॉक्टरांनी घ्यावा : पालकमंत्री ; खासगी डॉक्टरांच्या मदतीने कोविड रूग्णालय सुरू

अकलूज, दि. १५ – स्वत:च्या खिशातील दोन कोटी रूपये खर्च करून अकलूज व परिसरातील सुमारे १५० डॉक्टरांनी स्वयंत्स्फूर्तीने १०० बेडच्या कोविड हॉस्पिटलची निर्मिती केली. महाराष्ट्र राज्यातील डॉक्टरांनी अकलूजचा हा आदर्श घ्यायलाच पाहिजे, असे गौरवोद्गार सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले.

शनिवार १५ आँगस्ट रोजी अकलूज येथे कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.क्षकोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता अकलूज व परिसरातील डॉक्टरांनी कोविड हॉस्पिटलच्या निर्मितीचा केलेला प्रकल्प हा अत्यंत स्तुत्य आहे. या हॉस्पिटलला शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करू. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सीईओ, माळशिरस तालुक्याचे प्रांत व तहसीलदार यांनीही दवाखान्याच्या निर्मितीसाठी सर्व सहकार्य केले असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले, आज कोविड हॉस्पिटलसाठी देण्यात आलेली एमटीडीसीची इमारत गेल्या अनेक वर्षांपासुन बांधून तयार आहे. थोड्याशा निधीअभावी आतील कामे राहिली होती. याच इमारतीचा हॉस्पिटलच्या कामासाठी उपयोग होतो आहे. शासनाने उर्वरित कामे पुर्ण करण्यासाठी आणखी निधी देण्याची गरज आहे. कोरोनावर उपचार घेताना दुर्देवाने काही रूग्णांचा मृत्यू होतो. अशा रूग्णांसाठी शासनाने अकलूजच्या स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनीची व्यवस्था करून द्यावी. हॉस्पिटलसाठी ऑक्सिजन फार मोठ्या प्रमाणावर लागते. त्याचीही कमतरता भासू देऊ नये.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नितीन एकतपुरे यांनी केले. ते म्हणाले, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व धैर्यशील मोहिते-पाटील यांनी डॉक्टरांसमोर या दवाखान्याची व त्यासाठी लागणाऱ्या जागेची कल्पना मांडली. येथे रूग्णांवर उपचाराबरोबरच काऊन्सलिंगही होणार आहे.

यावेळी भाजपा नेते विजयसिंह मोहिते-पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, आमदार राम सातपुते, प्रांताधिकारी शमा पवार, तहसीलदार अभिजित पाटील, पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, जि. प. सदस्या शीतलदेवी मोहिते-पाटील, अकलूज व परिसरातील डॉक्टर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादीमध्ये गट नाहीत

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना पालकमंत्री भरणे म्हणाले की, राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि शरद पवार असे कोणतेही गट-तट नाहीत. पवार कुटूंब हे अभेद्य आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडी मोडणार नाही. त्याचबरोबर सध्या सोलापूर जिल्ह्यात असणारा युरीयाचा तुटवडाही लवकरच संपणार आहे. आजच त्याबाबत आढावा बैठकघेतली आहे.

विजयदादांनी राबवला उपक्रम

विजयसिंह मोहिते-पाटील उपमुख्यमंत्री असताना आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांच्यासह दादांनी खासगी डॉक्टरांनी सरकारी दवाखान्यात जाऊन मोफत सेवा देण्याचा प्रस्ताव मांडला होता. हा उपक्रम आजही राज्यभर राबवला जातोय.

– आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!