अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यात पाहणी
सोलापूर, दि.22: केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचे पथक आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी मोहोळ तालुक्यातील लांबोटी, कोळेगाव आणि पेनूर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
ऑक्टोबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. त्याची पाहणी आज केंद्र सरकारच्या ग्रामविकास विभागाचे उपसचिव यश पाल आणि रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता तुषार व्यास यांनी केली. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, तहसीलदार जीवन बनसोडे यांच्यासह अधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
लांबोटी येथील शेतकरी तात्या चंदनशिवे यांच्या ऊस पिकाची पथकाने पाहणी केली. कोळेगाव येथील देशमुख वस्तीवरील बंधाऱ्याची, शेतीची, विजेच्या खांब, पडझड झालेल्या घरांची पाहणी करून माहिती घेतली. याठिकाणी अतिपावसाने भोगावती, सीना आणि नागझिरा नद्यांचे पाणी रात्री अचानक आले. यामुळे कुंडलिक देशमुख, निखिल देशमुख यांचे घर वाहून गेले. आणखी चार-पाच घरांची पडझड झाली आहे. जिल्हाधिकारी श्री शंभरकर यांनी पथकाला माहिती दिली.
पेनूर येथील श्रीमती फुलाबाई माने आणि श्रीमती विजयाताई चव्हाण यांच्या मका पिकाचे नुकसान झाले आहे. येथे अजून शेतात चिखल असल्याचे पथकाच्या निदर्शनास आणून दिले. पिकाचा पंचनामा झाला असून मदत त्वरित मिळेल, अशी माहिती पथकाला देण्यात आली. भारत सलगर यांच्या दीड एकर केळीच्या बागेचे नुकसान झाले आहे. पथकाने प्रत्यक्ष केळीच्या बागेत जाऊन माहिती घेतली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माने यांनी केळीची प्रक्रिया समजावून सांगितली.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी लॉक डाऊन मुळे पश्चिम बंगाल येथील केळीचे काम करणारे मजूर गेल्याने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगितले. केंद्रीय पथकातील श्री व्यास यांनी शेतातील माती वाहून गेलेल्या ठिकाणी कृषी विद्यापीठाची मदत घेऊन काम करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे श्री.यशपाल आणि श्री.व्यास यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी श्री. माने, श्री.पडळकर, श्री. शेलार यांनी शेती, वीज यंत्रणा, रस्ते यांच्या नुकसानीची माहिती दिली.
या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, प्रकल्प संचालक संजय कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, पशुसंवर्धन उपायुक्त सोनवणे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास कोरे, दत्तात्रय गावडे, संभाजी धोत्रे, सुनील कटकधोंड आदी उपस्थित होते.