पंढरपूर – माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने गतहंगामात गाळप झालेल्या उसाला तीनशे रुपयांचा ऊसबिल हप्ता शेतकऱ्यांना देण्यात येणार असून पैकी 200 रुपये प्रतिटन लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. अशी माहिती अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली.
कारखान्याची 2019-20 ची एफआरपी 2407 रुपये प्रतिटन असून आतापर्यंत 2200 रुपये प्र. टन शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. दोनशे रुपये प्रतिटन हप्ता शेतकऱ्याला मिळताच एफआरपी पूर्ण होणार आहे. एफआरपी पेक्षा जास्त शंभर रुपये पुढच्या काही दिवसात शेतकऱ्यांना देण्यात देणार आहेत. तर या गळीत हंगामात 20 लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट असल्याचे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले
शिंदे सहकारी साखर कारखान्याचा विसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ शनिवार रोजी सकाळी 11 वाजत आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बबनदादा शिंदे होते. यावेळी जिल्हा परिषदचे सदस्य रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे, कार्यकारी संचालक राजेंद्र रणवरे, मुख्य शेतकी अधिकारी संभाजी थिटे , जनरल मॅनेजर एस. आर. यादव उपस्थित होते.सत्यनारायण पूजा संचालक विष्णु हुंबे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.वंदनाताई हुंबे यांचे शुभहस्ते करण्यात आली.
कारखान्याकडे 22 लाख टन उसाची नोंद असून युनिट-2 कडे सहा लाख लाख टन उसाची नोंद आहे .त्यामुळे या कारखान्याचे वीस लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट असून युनिट टू चे पाच लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.चालू हंगामामध्ये साखरेचे उत्पादन राष्ट्रीय पातळीवर जास्त होणार असल्याने पुढची परिस्थिती लक्षात घेता जास्तीत जास्त इथेनॉल निर्मिती करण्यात येणार असून सध्या तीन कोटी लीटर इथेनॉल विक्री करण्यात येणार आहे तर चार कोटी लीटर उत्पादन क्षमता ठेवण्यात आलेली आहे. कारखान्यात दहा ते अकरा कोटी युनिट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.