‘अर्थव्यवस्थे’वर सोलापूर विद्यापीठातर्फे सोमवारी ऑनलाइन राष्ट्रीय चर्चासत्र
सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुलातील अर्थशास्त्र विभागामार्फत सोमवार, दि. 6 जुलै 2020 रोजी सकाळी 11 वाजता ‘आत्मनिर्भर आर्थिक पॅकेज आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे पुनर्जीवन’ या विषयावर ऑनलाइन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा. डॉ. डी. व्ही. जहागीरदार यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे. यावेळी त्यांचे उद्घाटनपर भाषण होईल. त्यानंतर बंगळुरू विद्यापीठातील प्रा. डॉ. एस. आर. केशवा हे ‘आत्मनिर्भर पॅकेज आणि कृषी व उद्योग’ या विषयी मार्गदर्शन करतील. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी देखील यावेळी ‘आत्मनिर्भर पॅकेज: समाज आणि अर्थव्यवस्था’ याविषयी संबोधित करणार आहेत.
कोरोनामुळे संपूर्ण जग आर्थिक संकटात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीय अर्थव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचा विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी तसेच नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी केले आहे. या चर्चासत्राचे नियोजन सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश व्हनकडे हे करीत आहेत.