आम्ही जातो आमच्या गावा.. पालख्यांनी घेतला पंढरीनाथाचा निरोप
पंढरपूर, – कोरोना प्रादुर्भावामुळे यंदा आषाढीच्या सोहळ्यासाठी आलेल्या नऊ पालख्यांनी गुरूवारी द्वादशी दिवशीच पंढरीनाथाचा निरोप घेतला. प्रतिवर्षी पौर्णिमेला गोपाळपूरचा काला झाल्यानंतर या पालख्या पायी परत जात असतात मात्र यंदा त्यांचा येताना व जातानाचा प्रवास हा बसने झाला आहे.
आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी शासनाने नऊ पालख्यांना पंढरीत येण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार दशमी दिवशी या पालख्या राज्याच्या पाच जिल्ह्यातून येथे आल्या होत्या. यंदा पायी वारी रद्द असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या माध्यमातून संत पादुकांना प्रशासनाच्या नियोजनात पंढरीत आणण्यात आले होते. पालखी सोहळ्यांनी पौर्णिमेपर्यंत पंढरपूरला राहण्याची मागणी केली होती मात्र प्रशासन व पालखी सोहळे प्रमुख यांच्यात चर्चा होवून कोरोनाची स्थिती पाहता ठरल्याप्रमाणे द्वादशीलाच पालख्या परत नेण्याचे ठरले. त्यानुसार गुरूवारी दुपारी आलेल्या सर्वच पालखी सोहळ्यांनी पंढरपूर सोडण्यास सुरूवात केली. जगत्गुरू संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर माउलींच्या पालख्या ही देहू व आळंदीकडे बसमधून निघाल्या.
प्रतिवर्षी लाखो भाविकांच्या साक्षीने येणार्या पालख्या जाताना खूप कमी भाविकांसमवेत पायी चालत जात असतात मात्र यंदा कोरोनामुळे केवळ वीस भाविकांसमवेत पालख्या पंढरीत बसने आल्या आणि जाताना बसनेच 20 भाविकांसमवेत परतल्या आहेत. परतीच्या प्रवासासाठी बसेस फुलांनी सजविण्यात आल्या होत्या.