आरेवाडीच्या बिरोबा देवस्थान विकासकामांना निधी उपलब्ध करून देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
*बिरोबा देवस्थानची विकासकामे दर्जेदार व्हावीत*
*-उपमुख्यमंत्री अजित पवार*
मुंबई, दि. 20 :- सांगली जिल्ह्याच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा देवस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून या देवस्थानला दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येत असतात. आरेवाडी देवस्थानाला भेट देणाऱ्या भाविकांना आश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बिरोबा देवस्थान विकास आराखड्यातील सर्व कामे दर्जेदार पद्धतीनं करण्यात यावीत. विकासकामांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करण्यात येऊ नये. या कामांसाठी लागणारा निधी आवश्यकतेनुसार उपलब्ध करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात बिरोबा देवस्थान विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला गती देण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे निर्देश दिले. बैठकीला राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, पर्यटन राज्यमंत्री अदितीताई तटकरे, आमदार सुमनताई पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार विक्रम सावंत, बिरोबा देवस्थान ट्रस्टचे राहूल कोळेकर, जगन्नाथ कोळेकर, दाजी कोळेकर आदी मान्यवरांसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यातील आरेवाडीचे बिरोबा देवस्थान ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्र आहे. तिर्थक्षेत्र विकासांतर्गत देवस्थान आणि परिसराचा विकास करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यांतर्गत अंतर्गत रस्ते, वाहनतळ, स्ट्रीटलाईट, भक्त निवास व स्वच्छतागृह, सांडपाणी व्यवस्थापन, दुकानगाळ्यांचे बांधकाम आदी विकासकामे सुरु आहेत. ही सर्व बांधकामे दर्जेदार असली पाहिजेत. मंदीर व देवस्थान परिसराचे सुशोभिकरण करताना परिसरात मोठ्या प्रमाणावर स्थानिक देशी झाडांची लागवड करण्यात यावी. त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाची मदत घ्यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी परिसराला भेट देऊन स्वत: विकासकामांचा आढावा घ्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या बैठकीत दिल्या. उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर आरेवाडीच्या बिरोबा देवस्थान विकासाची प्रक्रिया गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.