आला पावसाळा ..गतवर्षीचा अनुभव पाहता पूररेषेतील गावांनी दक्षता घेण्याची प्रशासनाची सूचना

पंढरपूर– गेल्या वर्षी अतिवृष्टीने आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील नदीकाठच्या गावांसह शेती पिकांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. संभाव्य येणार्‍या नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी तसेच जीवित व पशुहानी टाळण्यासाठी तालुका आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच भीमा नदी काठच्या पूररेषेतील गावांनीही दक्षता घ्यावी अशा सूचना तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिल्या.

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती बैठक सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय पंढरपूर येथे घेण्यात आली. याबैठकीस गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरविंद गिराम, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र पवार, सहायक उपनिबंधक एस.एम.तांदळे, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, भीमा पाटबंधारे विभागाचे एस. एन. चौगुले यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

तालुक्यातील नदी काठच्या गावांना संभाव्य पुरामुळे कोणताही धोका पोहचणार नाही तसेच जीवित व वित्तहानी होणार नाही यासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत योग्य नियोजन करण्यात आले आहे. तसेच महापुरामुळे नदी काठावरील गावांमधील ज्या लोकांची घरे पुरामुळे बाधित झाली आहेत त्यांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. तसेच तालुका प्रशासनाकडून संबधित गावातील शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, धर्मशाळा आदी सुरक्षित ठिकाणी थांबण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार बेल्हेकर यांनी दिली.

उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सोडण्यात येणार्‍या विसर्गाबाबत संबधित विभागाने समन्वय ठेवून नियोजन करावे. नदी पात्रातील अतिक्रमणे केलेल्या नागरिकांनी तातडीने अतिक्रमणे काढावीत व सुरक्षित ठिकाणी जावे. नदी, नाले, ओढे या वरील असलेल्या पुलांची व संरक्षण कठड्यांची पाहणी बांधकाम विभागाने करावी. पावसाळ्यात साथीचे रोग अधिक उद्भवण्याची शक्यता असते यासाठी आरोग्य विभागाने वैद्यकीय सेवा व औषध पुरवठा सुरळीत ठेवावा अशा, सूचनाही बेल्हेकर यांनी यावेळी दिल्या.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!