आवताडे यांच्या विजयासाठी मोहिते पाटलांचे कार्यकर्ते मतदारसंघ पिंजून काढतील : आ. रणजितसिंह
अकलूज – राज्यातील एकमेव विधानसभा पोटनिवडणूक पंढरपूरमध्ये होत असून याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. येथील लढत प्रतिष्ठेची झाली आहे. भाजपाने समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर करुन युवा आणि विकासाभिमुख दृष्टीकोन असणा-या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. मोहिते पाटील गटाचे सर्व कार्यकर्ते पंंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ पिंजून काढून जोमाने आवताडे यांचा प्रचार करत आहेत, असे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.
भाजपाचे पंढरपूरचे उमेदवार समाधान आवताडे यांनी आज अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर येवून मोहिते पाटील यांची भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात आली. यास ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, ल्क्ष्मणराव ढोबळे, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाधान आवताडे म्हणाले ,कोणालाही मिळणारी सहानुभूती ही क्षणिक असते. पंढरपूर व मंगळवेढ्याची जनता सुज्ञ असून दीर्घकालीन विचार करणारी आहे. महाविकास आघाडीतील अनेक घोटाळे, भ्रष्टाचार दररोज समोर येत आहेत. त्यामुळे ही जनता भालकेंना सहानुभूती न दाखवता भाजपाच्या विकासाला प्राधान्य देऊन मलाच निवडून देईल. शिवरत्न, पांडुरंग व दामाजी परिवार एकत्र आल्याने माझाच विजय होणार आहे.
भाजपाचे जिल्हा सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने आवताडे यांच्या प्रचारात उतरण्याचे आवाहन केले.
पोकळ आश्वासने देणार नाही
नुकतेच जयंत पाटील यांनी आचार संहिता संपताच ३५ गावच्या पाणी प्रश्नाचा निकाल लावू असे म्हटले आहे. मी लहान असल्यापासून हा पाणी प्रश्न प्रलंबित असल्याचे पाहतो आहे. हा प्रश्न एवढा सोपा असता तर कधीच सुटला असता. याच्यावर तात्पुरती मलमपट्टी करुन, तो सुटला असे दाखवण्याचा जयंत पाटीलक्षयांचा खटाटोप दिसतोय. आम्ही मात्र थोडा वेळ घेऊ पण, हा प्रश्न कायमचा निकाली काढू. हा पाणी प्रश्न फक्त भाजपा सारखा सक्षम व केंद्रात सत्ता असलेला पक्षच सोडवू शकतो हे जनतेलाही समजते.
– समाधान आवताडे