राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी www.vedhak.com ला जरुर भेट द्या.
पंढरपूर – कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असली तरी तिसर्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. यंदा गेल्यावर्षीपेक्षा राज्यात आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यात जास्त रुग्ण सापडले असल्याने आषाढी यात्रेला 17 ते 25 जुलै पर्यंत 7 दिवस पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावात संचारबंदीचा प्रस्ताव असून तो शासनाला पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
याबाबत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावाला शासनाने हिरवा कंदील दाखवला असून लवकरच याबाबत सविस्तर आदेश निघण्याची शक्यता आहे. यंदा सर्व मानाच्या 10 पालख्या बसमधून आषाढी दशमीदिवशी पंढरपूर मध्ये येणार असून त्या पौर्णिमेला परत जाणार असल्याने पंढरपूर शहरात 7 दिवस संचारबंदीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याकाळात सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुका आणि पंढरपूर शहर सीमा अशा तीन ठिकाणी तिहेरी नाकेबंदी करण्यात येणार असून परवानगी दिलेल्या भाविकांशिवाय कोणालाही पंढरपूरला आषाढीसाठी प्रवेश दिला जाणार नाही. जर अशातही काही भाविक जर पंढरपूरकडे आले तर त्यांची समजूत घालून त्यांना परत पाठवले जाणार असल्याचे सातपुते यांनी सांगितले.
आषाढी यात्रा काळात चंद्रभागेत स्नानासाठी भाविकांनी येऊ नये म्हणून चंद्रभागा परिसरात 144 कलम पुकारले जाणार आहे . ज्या भाविकांना शासनाने परवानगी दिली आहे अश्या भाविकांना पासेस देऊन त्यांनाच नगरप्रदक्षिणा आणि विठ्ठल मंदिरात सोडण्यात येणार आहे. याशिवाय पंढरपूर शहरातील नागरिकांनाही बाहेर पडत येणार नसल्याचे सातपुते यांनी सांगितले. सध्या सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे संकट अजूनही कायम असल्याने सदरची खबरदारी घेतली जात असून प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावाला शासनाने हिरवा कंदील दाखवल्याने लवकरच याबाबत सविस्तर आदेश निघतील असे तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मागील वर्षीही अशाच पध्दतीने आषाढीच्या काळात भाविकांना पंढरीत येण्यापासून रोखण्यात आले होते. यानंतर वर्षभरातील सर्वच यात्रा काळात हीच पध्दत अवलंबली गेली आहे. यंदा सलग दुसर्या वर्षी आषाढी यात्रा भरत नसून पालख्या पंढरीत बसच्या माध्यतातून आणल्या जात आहेत.