आषाढीनिमित्त नामवंत प्रवचनकारांचे फेसबुक लाइव्हद्वारे १९ दिवस श्री ज्ञानेश्वरी ग्रंथावर निरूपण

ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , श्री क्षेत्र आळंदी व महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचा पुढाकार

आळंदी दि . ५ – यंदा जगावर कोरोनाचे महासंकट कोसळले आहे . त्यामुळे आषाढी पायी दिंडी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे . या आषाढी वारीत जगभरातील वैष्णवांना वारीचा घरबसल्या आनंद घेता यावा या हेतूने श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , श्री क्षेत्र आळंदी व महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाच्या वतीने राज्यातील नामवंत तरुण प्रवचनकारांचे श्री ज्ञानेश्वरी ग्रंथावर निरूपण आयोजित केले असून हे निरूपण जगभरातील वैष्णवांना फेसबुक लाइव्हद्वारे पाहता व ऐकता येइल अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्थ ॲड विकास ढगे पाटील यांनी दिली .

ॲड ढगे पाटील म्हणाले , आषाढी वारी म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग असा सोहळा . संत ज्ञानदेव , संत तुकाराम , संत निवृत्तीनाथ , संत सोपानदेव , संत मुक्ताबाई , संत एकनाथ , संत नामदेव आदी संतांसमवेत आषाढी पायी वारीत सहभागी होवून वारीचा आनंद घ्यायचा ही प्रत्येक वैष्णवांची इच्छा असते . महाराष्ट्रासह इतर प्रांतातून व परदेशातून लाखो भाविक संतांसमवेत टाळ मृदुंगाचा गजर व हरीनामाचा जयघोष करीत श्री क्षेत्र पंढरीस येतात . पवित्र चंद्रभागेचे स्नान करतात . विठुरायाचे दर्शन घेतात व नगर प्रदक्षिणा करुन पुन्हा मोठ्या आनंदाने आपल्या गावी परततात . शेकडो वर्षांची ही परंपरा यावर्षी करोनाच्या जागतीक संकटामुळे मोडते की काय ? वारीचा जो आनंद आहे त्यापासून आम्ही दूर जातो की काय ? अशी भीती प्रत्येकाच्या मनात आहे . परंतु श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाने जगभरातील वैष्णवांना आषाढी वारीत पायी चालायला मिळणार नसले तरी घरात बसून मनाने वारीत बरोबर राहण्यासाठी श्री ज्ञानेश्वरी ग्रंथावर निरूपण हा उपक्रम हाती घेतला आहे . श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ निरूपण पालखी सोहळा पत्रकार संघाच्या https://m.facebook.com/palkhisohalapatrakarsangh या फेसबुक पेजवर शनिवार दि . १३ जून रोजी माउलींचा प्रस्थान सोहळा ते बुधवार दि १ जुलै आषाढी एकादशी असे १९ दिवस दररोज सायंकाळी ४ ते ५ या वेळेत लाइव्ह केले जाणार आहे .
या श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ निरूपण सोहळ्यात राज्यातील नामवंत तरुण कीर्तनकार ह भ प जयेश महाराज भाग्यवंत – डोंबिवली (अध्याय पहिला ) , ह भ प जगन्नाथ महाराज गर्जे – पाथर्डी (अध्याय दुसरा ) , ह भ प किशोर महाराज खरात , सिन्नर (अध्याय तिसरा ) , ह भ प भानूदास महाराज टेंबुकर – पंढरपूर ( अध्याय चौथा ) , ह भ प योगेश महाराज गोसावी – पैठण (अध्याय पाचवा ) , ह भ प स्वप्नील महाराज कापशीकर – पुणे (अध्याय सहावा ) , ह भ प विजय महाराज खवले – मोताळा जि बुलढाणा ( अध्याय सातवा ) , ह भ प विशाल महाराज खोले – मुक्ताईनगर जि जळगाव ( अध्याय आठवा ) , ह भ प योगेश महाराज जाधव – नगर ( अध्याय नववा ) , ह भ प सुरेश महाराज सुळ – अकलूज जि सोलापूर ( अध्याय दहावा ) , ह भ प समाधान महाराज शर्मा – केज जि बीड ( अध्याय अकरावा ) , ह भ प सचिन महाराज पवार – पुणे ( अध्याय बारावा ) , ह भ प बंडु उर्फ विनायक महाराज चौगुले – खोची जि कोल्हापूर ( अध्याय तेरावा ) , ह भ प कृष्णा महाराज चवरे – पंढरपूर ( अध्याय चौदावा ) , ह भ प प्रमोद महाराज राहणे – अकोला ( अध्याय पंधरावा ) , ह भ प प्रशांत महाराज ताकोते – अकोला ( अध्याय सोळावा ) , ह भ प ज्ञानेश्वर महाराज पाटील – बावी जि सोलापूर ( अध्याय सतरावा ) , ह भ प रविदास महाराज शिरसाठ – आळंदी (अध्याय अठरावा पुर्वार्ध ) , ह भ प रविदास महाराज शिरसाठ – आळंदी ( अध्याय अठरावा उत्तरार्ध ) यांच्या अमृतवाणीतून दररोज एका अध्यायावर निरूपण करण्यात येणार आहे . श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ निरूपण ऐकण्याची तसेच दररोज वारीतील क्षणचित्रे पाहण्याची संधीही या फेसबुक पेजवरुन उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई यांनी सांगितले .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!