आषाढीसाठी पालखी सोहळे निघाले पंढरीकडे, मुख्यमंत्री महापूजेसाठी येणार, तयारी पूर्ण
पंढरपूर – कोेरोनामुळे यंदाचा आषाढी एकादशी सोहळा ही मागील वर्षीप्रमाणे प्रतीकात्मक साजरा होत असून उद्या 20 रोजी पहाटे महापूजा होणार असून या राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सपत्नीक येथे येत आहेत. याच बरोबर मानाच्या नऊ पालख्या या मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे निघाल्या असून येथे वाखरी तळावर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने त्यांचे स्वागत होणार आहे.
संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत मुक्ताई, संत एकनाथ, संत निळोबा, कौंडण्यपूरची रूक्मिणीमाता, संत चांगावटेश्वर हे नऊ पालखी सोहळे दुपारपर्यंत वाखरीत दाखल होणार तर संत नामदेव पालखी ही पंढरीतच असल्याने संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज यंदा या पालख्यांचे स्वागत करणार आहेत.
यावर्षी ही दहा प्रमुख संतांच्या पालख्यांना पंढरीत येण्याची परवानगी देण्यात आली आहे. यंदा पालखी सोहळे पौर्णिमेपर्यंत पंढरीत राहू शकणार आहेत. तसेच वाखरी ते विसावा ते पंढरपूरपर्यंत मर्यादित संख्येत पायी चालण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. नियोजनानुसार परगावाहून येणार्या नऊ संतांच्या पादुका दुपारी तीन वाजेपर्यंत वाखरी पालखी तळ येथे येतील असा अंदाज आहे. काही पालखी सोहळ्यांनी पहाटेच प्रस्थान ठेवले आहे. राज्य परिवहन महामंडळाने यासाठी बससेची सोय केली आहे. यानंतर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले तसेच वाखरी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व संतांच्या सोहळ्याचे स्वागत केले जाणार आहे. प्रत्येक पालखी सोहळ्या बरोबर 40 भाविकांना येण्याची परवानगी देण्यात आली असून एकूण वीस बस मधून हे वारकरी दाखल होणार आहेत. या सर्व वारकर्यांना मंदिर समितीच्या वतीने भोजन दिले जाणार आहे.
दरम्यान वाखरी पालखी तळावर सर्व संतांच्या पादुका काही वेळ स्थिरावल्यानंतर परंपरेप्रमाणे येथे पूजन होणार आहे. दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास या पालख्या वाखरी येथून दीड किमी. अंतरावरील इसबावी विसावाकडे मार्गस्थ होतील. विसाव्याजवळ परंपरे प्रमाणे संत नामदेव महाराजांची पालखी सर्व संतांचे स्वागत करणार आहे. येथून प्रत्येक सोहळ्यातील देन भाविकांच्या उपस्थितीत चालत संतांच्या पादुका पंढरीकडे येतील व मुक्काम मठात विसावतील. हे अंतर जवळपास चार किलोमीटर असून असून सायंकाळी हा सोहळा पंढरीत दाखल होणार आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. स्थानिकांसह भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये म्हणून मोठी खबरदारी घेण्यात येत आहे.
दरम्यान श्री विठ्ठल रूक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सहकुटुंब पंढरीत येणार आहेत. ते सोमवारी सायंकाळपर्यंत येथे येतील असे सांगण्यात येत आहेत.
दरम्यान आषाढीसाठीची तयारी पूर्ण झाली असून पालखी मार्गावर पोलिसांनी पादुका दर्शनासाठी गर्दी होवू नये यासाठी विशेष बंदोबस्त ठेवला आहे. वाखरीत राज्य राखीव दलाची तुकडी ही तैनात असणार आहे. याचबरोबर महापूजेच्या वेळी मंदिरात केवळ 40 लोकांनाच परवानगी आहे. मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाशिवाय महापूजेच्या ठिकाणी कोणाला परवानगी नाही. मंदिरातील सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. तपासणी व स्वच्छता पूर्ण करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा पाहता उच्च अधिकारी ही येथे आले आहेत.