आषाढी एकादशीला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पंढरपूरला येणार, श्री विठ्ठलाला साकडे घालणार..
पंढरपूर – राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आषाढी एकादशीला सर्व वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पंढरीत येवून श्री विठ्ठल रखुमाईला जगाला कोरोनामुक्त करण्याचे साकडे घालणार आहेत. याबाबत त्यांनी फेसबुक लाइव्हव्दारे माहिती दिली आहे.
श्री. ठाकरे यांनी आज राज्याला संबोधित केले, यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी आली असून केवळ परंपरा जपण्यासाठी मानाच्या ९ पालखींना वाहनाने पंढरपूरला आणले जात आहे. अन्य भाविकांना पंढरीत येण्यास मनाई आहे. यामुळे मुख्यमंत्री एकादशीला पंढरपूरला येणार कि नाही याकडे लक्ष होते. याबाबत बोलताना उध्दव ठाकरे यांनी आपण सर्व वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पढरीत जात असल्याचे सांगितले. १ जुलै एकादशी आहे. शासकीय महापूजा पहाटे असते. दरम्यान मुख्यमंत्र्यांचा दौरा कसा असणार हे लवकरच प्रशासनाकडून समजे.
मुख्यमंत्री वारकऱ्यांना आवाहन करताना म्हणाले, सर्व वारकऱ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू देत, ते घेवून विठुरायाला साकडे घालणार आहे.