आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांना समितीकडून निमंत्रण
पंढरपूर – आषाढी एकादशी १ जुलै रोजी असून या दिवशी पंढरपूरच्या श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सपत्नीक करावी. असा ठराव श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या २ जूनच्या बैठकीत करण्यात आला होता. आज ११ जून रोजी समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या स्वाक्षरीने ईमेलव्दारे मुख्यमंत्र्यांना महापूजेचे निमंत्रण देण्यात आले आहे
याबाबत समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. आषाढी एकादशीला प्रतिवर्षी राज्याचे मुख्यमंत्री विठ्ठल रखुमाईची महापूजा करतात त्यांच्या समवेत या पूजेचा मान वारकरी दाम्पत्याला ही दिला जातो. यंदा १ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे.
दरम्यान कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा पंढरपूरचे मंदिर १७ मार्चपासून भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. राज्यसरकारने ३० जून २०२० पर्यंत राज्यातील धार्मिक स्थळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.