आषाढी वारीचे नेटकेपणाने नियोजन करा, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची सूचना

पंढरपूर, : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने दिलेले निर्देश आणि परंपरा यांचा समन्वय साधून आषाढी वारीचे नेटकेपणाने नियोजन करा. यासाठी सर्व विभागांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिल्या.
भरणे यांनी आज आषाढी वारीच्या नियोजनाबाबत सर्व संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या संत तुकाराम भवन येथे बैठक झाली. यावेळी.जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, नगराध्यक्षा साधना भोसले, पंढरपूर मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त मुख्याधिकारी कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके आदी उपस्थित होते.
सुरवातीला श्री. ढोले यांनी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पालखी सोहळे यांचे आगमन, शासकीय महापूजा, नगर प्रदक्षिणा आदीबाबतचे नियोजन सांगितले.
श्री. भरणे यांनी सर्व संबधित विभागांनी नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या आणि कामकाज याबाबत पुढाकार घेवून काम करावे. कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास जिल्हा प्रशासन व मंदीर समिती यांच्याशी समन्वय ठेवून तोडगा काढावा, अशा सूचना दिल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांनी आपसात समन्वय ठेवून लसीकरण, स्वच्छता, आरोग्य तपासणी, शुध्द पाण्याचा पुरवठा, आवश्यक ठिकाणी तात्पुरती स्वच्छता गृहे, वाखरी पालखीतळ स्वच्छता याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशा सूचना श्री.भरणे यांनी यावेळी केल्या. यावेळी त्यांनी काही प्रतिनिधींच्या सूचना ऐकून घेतल्या. त्यावर संबधित विभागांनी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, राज्य उत्पादन शुल्कचे रवींद्र आवळे, जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढेले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!