आ. कै. भारत भालके जनसंपर्काच्या जोरावर तीनवेळा जिंकले, आता समाधान आवताडे यांचाही मतदारसंघ पिंजून काढण्यावरच भर
पंढरपूर – पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक होवू घातली असून आता याची तयारी सर्वच राजकीय पक्ष व गटतट करत आहेत. या मतदारसंघाच्या निर्मितीपासूनचा म्हणजे 2009 नंतरचा इतिहास पाहिला तर येथे तीनही वेळा भारत भालके हेच आमदार झाले व तेही निव्वळ जनसंपर्काच्या जोरावर. यात विशेष बाब म्हणजे तीनही वेळा वेगवेगळे पक्ष त्यांनी निवडले. आता त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत असून यात समाधान आवताडे हे तिसऱ्यांदा उभारण्याची तयारी करत असून त्यांनी मतदारभेटी मोठा भर दिला आहे व त्यांना चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.
मागील दोन निवडणुकांमध्ये आवताडे यांना होणारे मतदान वाढत चालले आहे. मंगळवेढा भागात त्यांचा असणारा राजकीय दबदबा, तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांच्या गटाची वाढती ताकद तसेच साखर कारखाने व अन्य संस्थांचे जाळे यामुळे ते यंदा विजयी होतील असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत.
दोन तालुक्यांचा हा विधानसभा मतदारसंघ असून पंढरपूर भाग पाण्याच्या व विकासाच्या बाबतीत मंगळवेढ्यापेक्षा वरचढ परिसर आहे. दोन्ही तालुक्यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. यामुळे येथे राजकीय बस्तान बसविणे कठीणच मानले जाते. 2004 ला पंढरपूर मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर भारत भालके यांनी 2009 च्या निवडणुकीची तयारी सुरू केली. त्यावेळी विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना होत होती. यात पंढरपूर- मंगळवेढा असा मतदारसंघ तयार झाला. भालके यांनी मंगळवेढा भागात जनसंपर्क वाढविला व याचा फायदा त्यांना झाला.
2009 ला सुधाकरपंत परिचारक यांना थांबवून राष्ट्रवादीने विजयसिंह मोहिते पाटील यांना येथून उमेदवारी दिली आणि या संधीचे सोने करत भालके यांनी विक्रमी मतांनी मोहिते पाटील यांचा पराभव केला. मोहिते पाटील यांना उमेदवारी दिल्याने सहाजिकच पंढरपूर भागात परिचारक गटाचे कार्यकर्ते व मतदार नाराज होते तर मंगळवेढ्यात नव्याने मोहिते व परिचारक यांना प्रचार करावा लागत होता. तत्पूर्वी काही महिने अगोदरच भारत भालके यांनी मंगळवेढ्यात जनसंपर्काच्या माध्यमातून आपले बस्तान बसविले होते. त्या निवडणुकीत दोन्ही तालुक्यातील सर्व बडे नेते मोहिते पाटील व परिचारक यांच्या व्यासपीठावर होते मात्र जनतेने भालकेंची साथ केली.
2009 च्या विजयानंतर भारत भालके यांचा आत्मविश्वास खूप वाढला. संस्थांचे जाळे नसतानाही जनतेच्या जोरावर त्यांना विजय मिळाला. यानंतरच्या काळात त्यांनी दोन्ही तालुक्यात आपला संपर्क कायम ठेवला. त्यांनी संस्था उभा केल्या नाहीत मात्र माणस जोडली. 2009 ला रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी हा त्यांचा पक्ष होता. यानंतर त्यांनी 2014 काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली कारण या आघाडी सरकारने मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मान्यता दिली होती. भालके यांनी निवडणुकीत आपल्याबरोबर नेते कोण येतात याचा कधी विचार केला नाही. जो येर्इल त्याला बरोबर घेवून त्यांनी काम केले. 2014 च्या विधानसभेला पंढरपूरमध्ये प्रशांत परिचारक यांच्या प्रचारासाठी भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ठेवली होती मात्र काहीही उपयोग झाला नाही. भारत भालके हे भाजपाची लाट राज्यातही असताना काँग्रेसच्या चिन्हावर या मतदारसंघात विजयी झाले.
2019 ला भारत भालके यांचा पक्ष निश्चित होत नव्हता. सुरूवातीला ते भाजपात जातील अशी चर्चा होती नंतर त्यांनी अचानक राष्ट्रवादीत प्रवेश केला व तिकिट घेतले. त्या निवडणुकीत काँग्रेसनेही येथे उमेदवारी दिली होती. आघाडी होवून देखील येथील उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. अशा स्थितीत भारत भालके यांनी येथे निवडणूक लढविली. ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक भाजपाचे उमेदवार होते. तेंव्हाही अनेकांनी परिचारक गटाला साथ करण्यासाठी भालकेंची हात सोडला मात्र निवडणूक निकाल लागला आणि भालके विजयी झाले.
मंगळवेढा व पंढरपूर भागात सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून भालके यांनी आपला मतदार निर्माण केला होता. याचा फायदा त्यांना झाला. सलग तीनवेळा ते आमदार झाले. दुर्दैवाने नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांचे निधन झाले व आता येथे पोटनिवडणूक होत आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्ष व येथील नेतेमंडळी कामाला लागली आहेत.
कै.भारत भालके यांनी ज्या त्यावेळी घेतलेले निर्णय हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. त्यांनी 2009 ला रिडालोसकडून निवडणूक लढविली मात्र नंतर काँग्रेसची साथ करत पाणी योजनेला मंजुरी घेतली व अन्य प्रकल्पांना निधी आणला.साखर कारखानदारीत आपले बस्तान बसविण्यासाठी विठ्ठल परिवाराला एकत्र करण्यात यश मिळविले. या परिवाराचे निकटवर्तीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी सतत सलोख्याचे संबंध ठेवत त्यांना आपला गुरू मानले. 2019 ला भाजपाची हवा असताना राष्ट्रवादीची साथ केली व सत्ता आल्यावर साखर कारखान्याला मदत मिळवून तो सुरू केला.
दरम्यान आता पोटनिवडणूक कधीही जाहीर होवू शकते. यासाठी मंगळवेढ्याचे उद्योजक समाधान आवताडे हे तिसऱ्यांदा आपले नशीब आजमाविण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी पंढरपूर व मंगळवेढा भागात जोरदार तयारी केली असून ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी मंगळवेढ्यात आपली ताकद दाखवून दिलीच मात्र पंढरपूर भागातील गावांमध्येही त्यांचे समर्थक विजयी झाले आहेत. आवताडे यांचे सतत दौरे सुरू असून पुढे कोणाचे आव्हानं आहे याचा विचार न करता त्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे.
मागील दोन निवडणुकांमध्ये त्यांच्या मतांच्या टक्केवारीत वाढच होत असून ते मंगळवेढा भागात मतदान घेण्यात आघाडीवर असतात मात्र त्यांना पंढरपूर भागातच मते कमी मिळतात. त्यांना दोन वेळा पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांनी खचून न जाता पुन्हा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. बाकी संभाव्य उमेदवार ही निवडणुकीची तयारी करत असले तरी आवताडे यांचे दौरे लक्षणीय ठरत आहेत.