आ.गोपीचंद पडळकर यांच्या पंढरीत एकाच दिवशी अठरा घोंगडी बैठका !

पंढरपूर – भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांचे पंढरपूर भागात दौरे वाढले असून ते 15 जून रोजी सकाळीपासून सायंकाळपर्यंत शहरातील विविध भागात 18 घोंगडी बैठका घेणार आहेत. यात बहुजन समाजातील लोकांशी संवाद साधणार आहेत. यास साद बहुजन हक्कासाठी असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान आ. पडळकर हे आगामी काळात पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा रंगत आहे.

आमदार पडळकर हे आक्रमक नेते म्हणून प्रसिध्द असून ते धनगर आरक्षणासाठीही आग्रही आहेत व सतत यासाठी ते प्रयत्नशील असतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टोकाची टीका करण्यासाठी ते प्रसिध्द आहेत. त्यांनी 2019 ला विधानसभेची निवडणूक देखील बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरोधात लढली होती. ते पराभूत झाले व यानंतर भाजपाने त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली.
महाविकास आघाडी सरकारविरोधात शाब्दिक हल्लाबोल करण्यासाठी प्रसिध्द असणार्‍या आमदार गोपीचंद पडळकर यांचे पंढरपूर भागात अलिकडच्या काळात खूपच दौरे वाढले आहेत. त्यांनी धनगर आरक्षणाचे आंदोलन ही पंढरपूरमधून सुरू केले होते. विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता. आता ते पंढरपूरला बहुजन समाज संवाद दौर्‍यासाठी येत आहेत. त्यांनी मंगळवार 15 जून रोजी एकाच दिवशी अठरा घोंगडी बैठकांचे पंढरपूर शहराच्या विविध भागात आयोजन केले आहे. याची सुरूवात ते सकाळी आठ वाजता संत नामदेव पायरीचे दर्शन घेवून करणार आहेत.
पडळकर मंगळवारी दाळे गल्ली, कुंभार गल्ली, कैकाडी महाराज मठ परिसर, गोसावी गल्ली, अनिलनगर, नरहरी सोनार महाराज मठाजवळ, घडशी गल्ली, शिवरत्न नगर, संत सेवा महाराज मठाजवळ, गवळी समाज मठाजवळ, गुरव समाज मठानजीक, लोणारी समाज भवन, मोरे महाराज मठा, संत सावता माळी मठ, कालिकादेवी मठ, स्टेशन रोड य, संत गाडगे महाराज मठ येथे घोंगडी बैठका घेणार आहेत. सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत त्यांच्या अठरा बैठका विविध ठिकाणी होतील.
यात ते विविध समाजातील मंडळींशी चर्चा करणार असून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. यात तेली, कुंभार, कैकाडी, वडार, गोसावी, काशीकापडी, सोनार, घडशी, डवरी, नाभिक, गवळी, गुरव, लोणारी, गोंधळी, माळी, कासार, बुरूड, परीट समाजाचा समावेश आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!