आ. डॉ. तानाजी सावंत सोलापूर जिल्ह्यात सक्रिय झाल्याने शिवसेनेत उर्जा
#tanaji_sawant #shivsena
पंढरपूर- गेले काही महिने शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार डॉ. तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यात फारसे सक्रिय दिसत नव्हते मात्र आता कोविड काळात त्यांनी जोरदार काम सुरू केल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अन्य राजकीय पक्ष आपली ताकद वाढविण्यासाठी येथे प्रयत्न करत असतान शिवसेनेत शांतता दिसत होती मात्र आता सावंत यांंच्या भूमिकेने ग्रामीण भागात पुन्हा पक्षात नवचैतन्य पसरल्याचे चित्र आहे.
तानाजी सावंत हे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात काम पाहात असून परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांचे गाव सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव असून या भागातही सावंत यांची ताकद आहे. येथील काम त्यांचे बंधू प्रा.शिवाजीराव सावंत पाहात आहेत. मागील काही वर्षांत सावंत यांनी शिवसेनेत चांगलेच वजन निर्माण केले आहे. मागील पंचवार्षिकला ते युती शासनाच्या काळात कॅबिनेट मंत्री होते. यंदा महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कमी प्रमाणात मंत्रिपद तीन पक्षांना वाटून आल्याने अनेकांना मंत्रिपद मिळाले नाही. यात डॉ. सावंत यांचा समावेश होता.
दरम्यान सावंत हे मागील काही महिने शांत होते. मात्र आता ते सक्रिय झाले असून त्यांनी सोलापूर जिल्ह्यात जोमाने काम सुरू केले आहे. जेंव्हा आमदार सावंत हे सोलापूर जिल्ह्यात फारसे दौरे करत नव्हते तेंव्हा त्यांचे बंधू व पक्षाचे जिल्हा समन्वयक शिवाजीराव सावंत हे काम पाहात होते. आमदार सावंत यांनी बार्शी येथे कोविड सेटरच्या माध्यमातून रूग्णसेवेला प्राधान्य दिले आहे. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरसह सोलापूर भागाचा दौरा केला व कोरोनाच्या काळात शिवसेनेच्या वतीने नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे तसेच प्रशासकीय अधिकार्यांच्या बैठका घेवूनही जनतेला या संकटकाळात दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोनाच्या या भयानक संकटकाळात राज्याचा सेनापती म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे देत असलेला लढा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने कुठलीही उणीव ठेवू नये, असे आवाहन आमदार तानाजी सावंत यांनी पंढरपूर येथे आयोजित बैठकीमध्ये केले.त्यांनी विश्रामगृह येथे अधिकार्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी अधिकार्यांना सूचना केल्या. बैठकीस तहसीलदार सुशील बेल्हेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, सहायक गटविकास अधिकारी पिसे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पोलीस निरीक्षक अरुण पवार, आरोग्य विस्तार अधिकारी डॉ.जावळे, शिवेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा.शिवाजी सावंत, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, जिल्हा प्रमुख गणेस वानकर, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत, साईनाथ अभंगराव उपस्थित होते.
पुढे बोलताना सावंत यांनी, तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी या संकटकाळात जनतेच्या संपर्कात राहून काम करीत आहेत. त्यांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत हे लक्षात घेता अधिकारी आणि शिवसैनिक यांनी समन्वय राखून उपायोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच सावंत यांनी याप्रसंगी कोरोना बाबतच्या उपायोजना, ऑक्सिजन रेमडेसिवीर इंजेक्शन, लस, महात्मा फुले जनआरोग्य योजनेची माहिती अधिकार्यांकडून माहिती घेतली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी, पंढरपूरसह मंगळवेढा, माळशिरस, सांगोला, माढा व करमाळा तालुक्यात कोरोना रुग्णावर उपचाराबाबत येणार्या अडचणी मांडल्या. बैठकीस उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, तुकाराम भोजने, दत्ता पवार, जयवंत माने, स्वप्नील वाघमारे, महावीर देशमुख, रवी मुळे, कमरुद्दीन खतीब, काका बुराडे, माउली अष्टेकर उपस्थित होते