उच्च शिक्षण क्षेत्रात संशोधन वाढवा: डॉ. दाबक ; सोलापूर विद्यापीठातर्फे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर वेबिनार संपन्न
सोलापूर – उच्च शिक्षण क्षेत्रामधील येणाऱ्या काळातील आव्हानांना सामोरे जाताना सहभागिता शिक्षण पद्धत अवलंबावी लागणार आहे. यासाठी संशोधन वाढवणे अतिशय आवश्यक असून तेव्हाच उच्च शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असे प्रतिपादन नीती आयोगाचे सदस्य डॉ. महेश दाबक यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील आयक्यूएसी विभाग, भारतीय शिक्षण मंडळ व निती आयोगाच्या सहयोगाने आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी विषयाच्या वेबिनारमध्ये डॉ. दाबक हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. यावेळी नागपूरच्या व्हीएनआयटी येथील तज्ञ डॉ. दिलीप पेशवे, प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. आयक्यूएसी विभागाचे संचालक डॉ. व्ही. बी. पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले.
डॉ. दाबक म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण अमलात आणण्यासाठी सगळ्यांना एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. तेव्हाच विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने संबंधित विषयाचा उजाळा मिळेल, त्याविषयी जागृती होईल. येणाऱ्या काळातील आव्हानांना पेलण्याची क्षमता निर्माण होईल, या पद्धतीने शिक्षकांनादेखील सहभागिता पद्धत वाढवावी लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
डॉ. पेशवे म्हणाले की, विद्यार्थ्यांचा संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी बाहेरील जगातील ज्ञान देणे आवश्यक आहे. कृतिशील व अनुभूती शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे राहणार आहे. बाबा आमटे, प्रकाश आमटे यांच्या विषयी अनेक उदाहरणे देऊन त्यांनी कृतिशील शिक्षण पद्धतीचा आढावा घेतला.
कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कौशल्याभिमुख अभ्यासक्रमाचे महत्त्व विशद केले. सामान्य जनतेचा विचार करून सुरू केलेले अनेक कोर्सेस तसेच इनोव्हेशन, इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून राबवलेले उपक्रम व कार्यक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली. सहभागिता शिक्षण अतिशय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या वेबिनारसाठी डॉ. श्रीराम राऊत यांचे तंत्रसहाय्य लाभले, प्रा. चंद्रकांत गार्डी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.