पंंढरपूर – सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणार्या उजनी धरणावर पावसाळ्याच्या सुरूवातीलाच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून गुरूवारी सकाळपर्यंत 21 मिलीमीटरची नोंद झाली आहे. जून महिन्याच्या पहिल्या तीन दिवसात येथे 29 मि.मी. पर्जन्यमान नोंदले गेले आहे.
उजनी जलाशयावर पावसाळा हा नेहमी उशिरा सुरू होतो. अगोदर भीमा खोर्यात पावसाचा जोर असतो व नंतर उजनी जलाशय परिसरावर पर्जन्यराजा बरसतो. मात्र यंदा जूनच्या पहिल्या दोन दिवसातच उजनीवर 29 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. 1 रोजी 8 मि.मी. पाऊस झाला होता. या प्रकल्पावर मागील वर्षी 2020 च्या पावसाळ्यात विक्रमी 1023 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद होती. एवढा पाऊस उजनीवर कधीही बरसत नाही.
16 मे 2021 ला तौक्ते वादळाच्या काळात ही राज्यात विविध भागात पावसाने हजेरी लावली होती. यात उजनीवर देखील 11 मि.मी. पावसाची नोंद होती. यामुळे उन्हाळा व मान्सूनपूर्व असा जवळपास 40 मि.मी. पाऊस जलाशय परिसरात कोसळला आहे.
उजनी धरणाची गुरूवार 3 जून रोजी स्थिती वजा 21.87 टक्के अशी आहे. पाणी पातळी 489.200 मीटर असून एकूण पाणीसाठा हा 1471 दशलक्ष घनमीटर (51.94 टीएमसी)आहे. मृतसाठ्यातील 331 दलघमी (11.72 टीमएसी) पाण्याचा वापर झाला आहे. सध्या कालव्यात 800 तर बोगद्यात 220 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.
पंढरपूर तालुक्यातील पाऊस
पंढरपूरः बुधवार 2 जून रोजी पंढरपूर शहर व तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली असून 20.77 सरासरी पर्जन्यमानाची नोंद आहे. एकूण पाऊस 186 मि.मी. झाला असून सर्वाधिक 27 मि.मी. ची नोंद ही पटवर्धन कुरोली मंडळात आहे.
बुधवारी रात्रौ झालेला पाऊसः
करकंब – 23 मि.मी., पटवर्धन कुरोली 27, भंडीशेगाव 22, भाळवणी 14, कासेगाव 23, पंढरपूर 18, तुंगत 13 मि.मी., चळे 25, पुळूज 22 मि.मी. एकूण 186 तर सरासरी 20.77 मि.मी.