उजनीवर वरूणराजाची कृपा सुरूच मात्र भीमा खोरे तहानलेलेच..!

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्यासह जलाशयकाठाची वरदायिनी असणार्‍या उजनी धरणावर पर्जन्यराजाची कृपा कायम असून मागील चोवीस तासात 38 मिलीमीटर पावसाची तेथे नोंद झाली असली तरी भीमा खोर्‍यात मात्र वरूणराजा अद्यापही दमदार बरसण्यास तयार नाही. दरम्यान उजनी धरणाला आता मृतसाठ्यातून बाहेर पडण्यासाठ्यासाठी केवळ 5.74 टक्के म्हणजेच 3 टीएमसी पाण्याची गरज आहे. दौंडजवळून या प्रकल्पात मिसळणार्‍या पाण्यातही वाढ झाली आहे.
उजनी जलाशयावर या पावसाळा हंगामात पहिल्या 45 दिवसात 235 मि.मी. पाऊस पडला असून तो योग्य प्रमाणात आहे. भीमा नदी परिसरात पडणार्‍या पावसामुळे सध्या दौंडचा धरणात येणारा विसर्ग हा 3705 क्युसेक इतका झाला आहे. सध्या धरणात एकूण पाणीसाठा हा 60.59 टीएमसी इतका आहे. याचबरोबर लाभक्षेत्र असणार्‍या सोलापूर जिल्ह्यात ही मागील तीन दिवसात पावसाने सतत हजेरी लावली आहे. मात्र ज्या भीमा व नीरा खोर्‍यात पावसाची गरज आहे येथे पर्जन्यराजा दमदारपणे बरसण्यास तयार नाही. मागील चोवीस तासात मुळशी प्रकल्पावर 15 मिलीमीटर वगळता अन्य धरणावर एक आकडी पर्जन्यमानाची नोंद आहे जे अत्यल्प मानले जाते.
जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपला तरी अद्याप भीमा व नीरा खोर्‍यात दमदार पावसाचा पत्ता नाही. या उलट मराठवाडा असो की कोकण अथवा अगदी सोलापूर जिल्ह्यात ही वरूणराजा चांगला बरसत असताना ज्या भागाला नेहमीच पाऊस साथ देतो त्या भीमा खोर्‍यातच यंदा त्याने ओढ दिल्याने सार्‍यांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!