उजनी जलाशयाकाठी दुर्मीळ पाणमांजराचे दर्शन
करमाळा – सोमवारी 28 डिसेंबर रोजी तालुक्यातील केत्तूर येथील सोमनाथ जरांडे यांनी उजनी जलाशयकाठावर दुर्मीळ पाणमांजर पाहिले आहे. यामुळे उजनी धरणावर वावरणार्या विविध जलचर प्राण्यांच्या यादीत वाढच होऊ लागल्याचे दिसून येत आहे.
सोमनाथ जरांडे यांनी पाणमांजर पाहिले मात्र त्यांना त्या प्राण्यांबाबत माहिती नसल्याने ते घाबरून गेले. याचवेळी तो प्राणीही त्यांना पाहून पळून जाऊ लागला. त्यावेळी सदर प्राण्याचे काही फोटो घेऊन त्यांनी स्थानिक पत्रकार राजाराम माने, पक्षी प्रेमी शिक्षक कल्याण साळुंके यांच्याकडे चौकशी केली. माने यांनी उजनीवरील पक्ष्यांचा अभ्यास करणारे डॉ. अरविंद कुंभार यांच्याकडे सदर प्राण्यांबाबत चौकशी केली असता ते पाणमांजर असल्याचे समजले. उजनी धरण परिसरात करमाळा भागात यापूर्वी पाणमांजर पाहिल्याची माहिती नाही.
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी अशी ओळख असलेले उजनी धरण गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय जलाशयाचा विस्तीर्ण पसारा आणि पाणथळ जागांची मोठ्या प्रमाणातील संख्या यामुळे हे शेकडो प्रजातीच्या पक्ष्यांचे आश्रयस्थान बनले आहे. सोबतच धरणाच्या पाण्यात सातत्याने वेगवेगळे जलचर प्राणी आढळून येत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी उजनीत मगरीच्या वावर आढळून आला होता. त्यांनतर दुर्मीळ असलेले स्टार सोनेरी कासव पाण्यात मिळाले होते. तर आता उजनीत पाणमांजराने येथे दर्शन दिले आहे.