पंढरपूर – जून महिन्याच्या सुरूवातीला भीमा खोर्यात अनेक धरणांवर पावसाने हजेरी लावली खरी मात्र नंतर याचा जोर ओसरला आहे. अत्यंत किरकोळ स्वरूपाचे पर्जन्य काही ठिकाणी नोंदले गेले आहे. उजनीसह अन्य प्रकल्पांना वरूणराजाची प्रतीक्षा आहे.
राज्याच्या विविध भागात मान्सूनचा पाऊस सुरू झाला असला तरी भीमा व नीरा खोर्यात याचा जोर कमी प्रमाणात दिसत आहे. जूनच्या सुरूवातीला चांगला पाऊस झाला मात्र नंतर जलाशयांच्या लाभक्षेत्राकडे पर्जन्यराजाने पाठ फिरविल्याचे चित्र आहे. यामुळे आता परिसरातील शेतकर्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व सरी कोसळल्या पण नंतर पाऊस गायब झाला आहे. मागील चोवीस तासात भीमा व नीरा खोर्यातील काही धरणांवर अत्यंत किरकोळ स्वरूपाचे पर्जन्य नोंदले गेले आहे.
उजनी जलाशयावर या पावसाळा हंगामात केवळ 37 मि.मी. पाऊस झाला आहे. दरम्यान पाणलोट क्षेत्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने प्रकल्पाची पाणी पातळी वाढली आहे. हे धरण जवळपास साडेचार टक्के वधारले आहे. 2 जून रोजी उजनी वजा 22.42 टक्के होती ती आज 13 जून रोजी वजा 17.97 टक्के अशा स्थितीत आहे.
भीमा खोर्यातील धरणांवर जून महिन्यात चांगला पाऊस होतो व तेथील प्रकल्प लवकर भरतात व यानंतर तेथील पाणी उजनीकडे येण्यास सुरूवात होते. यामुळे उजनी लाभक्षेत्राचे लक्ष ही भीमा खोर्यातील पर्जन्यमानाकडे असते.