उद्योगांसाठी लागणा-या परवानग्यांची प्रक्रिया अधिक सोपी करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि. 23; राज्यात कोरोना संकटानंतर आता राज्यात उद्योगांचे अर्थचक्र सुरु झाले आहे. राज्यात गुंतवणूकदारांसाठी उद्योगस्नेही धोरणाचा अवलंब केला जात आहे. अनेक अनावश्यक परवानग्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्याच बरोबर गुंतवणूक वाढून रोजगार निर्मिती वाढावी यासाठी आणखी काही परवानग्यांची संख्या कमी करुन ही प्रक्रिया अधिक सोपी करणार असल्याचे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.
आज खासगी गुंतवणूक सल्लागार संस्थांच्या (प्रायवेट एक्विटी फर्म्स) प्रतिनीधींसोबत मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. पी अनबलगन उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, कोरोनाने आपल्याला ‘घरी रहा- सुरक्षित रहा’ हे शिकवले आहे. याच धर्तीवर राज्यातील गुंतवणूक सल्लागारांनी सर्व गुंतवणूकदारांना राज्यातच गुंतवणूक करण्याचा सल्ला द्यावा. राज्यातील त्यांची गुंतवणूक ही सुरक्षित राहिल हा विश्वास त्यांनी निश्चित ठेवावा. राज्यात ग्रीन इंडस्ट्रीला चालना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या उद्योगांना खूप परवानग्यांची गरज नाही आणि ज्यांची लगेच सुरुवात करता येईल, अशा उद्योगांना ग्रीन उद्योग झोन मधून तत्काळ कार्यरत करण्याची प्रक्रीया सुरु करता येईल. यासाठी सिंगल विंडो सिस्टीम त्यांना मदतीची ठरु शकेल.
*सूचनांचे स्वागत*
– *उद्योगमंत्री सुभाष देसाई*
राज्याने उद्योगस्नेही धोरणाचा अवलंब केलेला आहे. परवानग्यांची संख्या ७६ वरुन २५ वर आणली आहे. भविष्यातही राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी आलेल्या सर्व तज्ज्ञांच्या सूचनांचे स्वागत केले जाईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले.
मुंबई नजिकच मॉडेल फार्मा पार्क तयार करण्यात येत आहे. त्याच बरोबर नव्या तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रॉनिक पार्कही उभे राहात आहे. उद्योग वाढीच्या योजनांसाठीची ही केवळ सुरुवात आहे. आपल्याला सर्वांच्या साथीने लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचा विश्वास शासनाच्या पाठीशी राहिल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी झालेल्या चर्चेत केदारा कॅपिटलचे मनिष केजरीवाल, के.के. आर इंडियाचे संजय नायर, ब्लॅकस्टोनचे अमित दीक्षित, बेन कॅपिटलचे अमित चंद्रा, वॉरबर्ज पिंकअसचे विशाल महादेविया यांनी सहभाग घेतला. कोरोना नंतर अर्थचक्राला गती देत असतांना डिजीटल तसेच तंत्रज्ञान क्षेत्राबरोबरच राज्यात मॅन्युफॅक्चरिंग, औषध निर्मीती, पायाभूत सुविधा, गृह निर्माण, उर्जा, बॅंकिंग यासारख्या अनेक क्षेत्रात गुंतवणूकीच्या संधी निर्माण होणार असल्याचे मत यावेळी या गुंतवणूक सल्लागारांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल काम्पानी यांनी केले.