उशिरा जमून ही युतीचे चांगभल, महाआघाडीत पेच
निवडणूक जाहीर झाली तरी चर्चेची गुर्हाळ सुरूच
गेले काही सुरू असलेला मोठा शाब्दिक संघर्ष पाहता लोकसभा निवडणुकांसाठी राज्य व केंद्रातील सत्ताधारी भाजपा व शिवसेना यांची युती होते की नाही अशी शंका होती मात्र भाजपा पक्षाध्यक्ष अमित शहा व शिवेसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी चर्चा केली आणि युतीची घोषणा केली नव्हे तर जागांबाबत ही निर्णय घेण्यात आले. सध्या युती प्रचारात गुंतली असताना दुसरीकडे दोन्ही काँगे्रस व समविचारी पक्षांना बरोबर घेण्यात अद्याप ही यशस्वी झालेल्या नाहीत. काँगे्रस व राष्ट्रवादी पक्षात अहमदनगर सारख्या जागांवरून अद्याप ही धुमश्चक्री सुरूच आहे तर दुसरीकडे दोन्ही काँगे्रस ज्यांना बरोबर घेवून लढण्याची इच्छा व्यक्त करत आहेत त्या बहुजन वंचित आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी ही आता त्यांना वेळेचा अल्टिमेटम दिला आहे.
राज्यात काँगे्रस व राष्ट्रवादीची आघाडी यापूर्वीच झाली आहे. त्यांनी जागा वाटपाच्या बैठका ही घेतल्या. या आघाडीची महाआघाडी करण्यासाठीचे प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत. मात्र यास अद्याप यश आलेले नाही. बहुजन वंचित आघाडीची स्थापना अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूरमध्ये केली व यास अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. या आघाडीच्या राज्यभर ज्या सभा होत आहेत त्यांना मोठी गर्दी होत आहे. मुंबईत ही अॅड. आंबेडकर यांनी यशस्वी सभा घेवून दाखविली. त्यांच्याशी बोलणी सुरू असल्याचे काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे सांगतात. दरम्यान एमआयएम चे प्रमुख असदद्दीन ओवैसी व अॅड. आंबेडकर यांची मैत्री असून हे बहुजन वंचित आघाडी सोबत येण्यास ओवैसी इच्छुक आहेत परंतु यास काँगे्रसचा विरोध असल्याचे चित्र आहे. यावरूनच महाआघाडीत इतके दिवस बिघाडी होत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान अॅड. आंबेडकर यांनी राज्यात अनेक सभा घेतल्या व 48 लोकसभा जागापैकी 22 ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यांचे प्रचार दौरे ही आता सुरू झाले आहेत. तरी ही दोन्ही काँगे्रस व आंबेडकर यांच्यात चर्चा होवून अंतिम निर्णय झालेला नाही. तर भाजपा शिवसेनेची साथ सोडून दोन्ही काँगे्रसच्या जवळ आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी हे देखील दोन्ही काँगे्रसच्या आघाडीपासून अद्याप दूर आहेत. शेट्टी यांनी हातकणंगले, माढा, बुलढाणा यासह अन्य काही जागांवर दावा सांगितला आहे. दरम्यान शेट्टी यांनी माढ्यातून उभे राहावे असा ठराव या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या माढ्यातून लढण्याच्या मनःस्थितीत आहेत. दरम्यान शेट्टी यांनी ही दोन्ही काँगे्रसना वेळेचे अल्टिमेटम दिले आहे. आता देशात लोकसभेची आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक तारखा ही जाहीर झाल्या आहेत. तरी ही महाआघाडीची चर्चा आता रेंगाळलीच आहे.