ऑनलाइन सहभागिता शिक्षणाशिवाय पर्याय नाही :कुलगुरु डॉ. फडणवीस यांचे शिक्षकांना प्रशिक्षण
सोलापूर, दि.16- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षण क्षेत्रात फार मोठे बदल होत आहेत. या ‘कोविड 19 चा’ संसर्ग रोखण्यासाठी ऑनलाइन शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शिक्षकांनी आता ऑनलाइन सहभागिता शिक्षण पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहावे, असे मार्गदर्शन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील आयक्यूएसी विभागाच्यावतीने ‘सहभागिता ऑनलाइन शिक्षण पद्धत आणि त्याचा वापर’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.
कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार एक ऑगस्ट पासून विद्यार्थ्यांचे वर्ग सुरु होतील. त्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सहभागिता पद्धतीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग उत्साहवर्धक असला पाहिजे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्लासरूममध्ये बसून शिक्षण घेता येत नसल्याने सध्याच्या वातावरणात ‘कोविड 19’ काळात ऑनलाईन शिक्षणपद्धतीच योग्य आहे. याचबरोबर अभ्यासक्रमातील 20 ते 30 टक्के मुद्द्यांवर सहभागिता पद्धतीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण द्यावे. याचबरोबर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देताना रिकॉल पध्दत, ब्रेन्स स्टॉर्मिंग, चित्र आणि परिच्छेद यावरून चर्चा, प्रश्नोत्तर पद्धती, प्रेझेन्टेशन इत्यादी माध्यमातून अभ्यास घेतला पाहिजे, असे सांगून कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी ऑनलाईन शिक्षण पद्धतीची सविस्तर माहिती शिक्षकांना दिली.
ऑनलाईन शिक्षण पद्धत व सहभागिता शिक्षण पद्धतीचा 20 ते 40 टक्के वापर शिक्षकांनी करावा. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणाची सोय नाही, अशांसाठी शिक्षणपद्धतीत सोय उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असे मत कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
ऑनलाइन कार्यशाळेत विद्यापीठातील 65 शिक्षकांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन आयक्यूएसी विभागाचे संचालक प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील, डॉ. एस. डी. राऊत, प्रा. सी. जी. गार्डी यांनी केले.