कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांचे निधन
करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांना पितृशोक
करमाळा– करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांचे वडील तालुक्यातील श्री आदिनाथ साखर कारखान्याचे संस्थापक व माजी अध्यक्ष कर्मयोगी गोविंदबापू पाटील (वय ९०, लव्हे, करमाळा) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. निधनानंतर लव्हे (करमाळा) या मूळगावी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यसंस्कारावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. संजयमामा शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, तहसीलदार समीर माने, सभापती गहिणीनाथ ननवरे, प्रा.शिवाजीराव बंडगर, आदिनाथचे अध्यक्ष धनंजय डोंगरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, हमाल पंचायतचे तालुकाध्यक्ष राहुल सावंत आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निर्मितीत गोविंदबापू पाटील यांचा मोठा वाटा होता. कारखान्यातून साखर निर्मिती होईपर्यंत चप्पल न घालण्याची प्रतिज्ञा करुन त्यांनी तब्बल तेवीस वर्षे चप्पल घातली नव्हती.