कल्याणराव काळेंवर पवार काका – पुतणे नाराज असणे स्वाभाविकच..

प्रशांत आराध्ये

२०१९ मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात त्यांनी दिलेला उमेदवार पराभूत करण्यासाठी तत्कालीन राज्यातील सत्ताधारी भाजपाने जंगजंग पछाडले होते. यात दोन्ही काँग्रेसमधील अनेकांच्या हाती कमळ दिले. यात पंढरपूरचे कल्याणराव काळे यांचाही समावेश होता. त्यावेळी शरद पवार व अजित पवार यांनी काळे यांना त्यांनी कशी मदत केली आहे याची आठवण करून दिली होती. आज राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून पवार हे किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. कदाचित 2019 ची लोकसभा निवडणुकीतील त्यांची काळेंवरील नाराजी अद्याप दूर झालेली दिसत नाही असे सध्या तरी चित्र आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पवार यांनी 2009 ला येथून निवडणूक लढविली असल्याने देशभर या मतदारसंघाची ओळख पवारांचा बालेकिल्ला म्हणून झाली होती. मात्र 2019 ला येथे खूप घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीचे तत्कालीन या मतदारसंघाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. पाठोपाठ अनेकांनी दोन्ही काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत कमळ हाती घेतले, याच दरम्यान अनेक वर्षे पंढरपूर विभागातील राजकारणात काँग्रेसबरोबर काम करणा तसेच शरद पवार यांच्याही चांगले संबंध असणाऱ्या व विठ्ठल परिवारातील कल्याणराव काळे यांनी ही लोकसभेला देवेंद्र फडणवीस यांना साथ दिली व राष्ट्रवादीच्या विरोधात प्रचार केला.

माढा लोकसभेची निवडणूक भाजपाने अत्यंत नेटाने लढविली व व्यूहरचना आखून काँग्रेसचे तत्कालीन सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवार केले. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह कल्याणराव काळे व या लोकसभा मतदारसंघातील दोन्ही काँग्रेसमधील अनेकांनी भाजपाला साथ केली येथे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचा पराभव झाला. शिंदे हे तत्पूर्वी जिल्हा परिषदेत भाजपाबरोबर होते. त्यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरम्यान 10 एप्रिल 2019 ला कल्याणराव काळे यांनी वाडीकुरोलीत झालेल्या सभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले.

कल्याणराव काळे यांचे व शरद पवार यांचे संबंध तत्पूर्वीच खूपच चांगले होते. याच वाडीकुरोली काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी कार्यक्रम घेवून लोकसभा निवडणुकीचे जणू रणशिंगच फुंकले होते. काळे हे विठ्ठल परिवारातील असल्याने पवार यांनी नेहमीच आमदार भारत भालके यांच्याप्रमाणे सहकार्य केले आहे. मात्र ऐन माढ्याच्या प्रतिष्ठेच्या लढतीच्या वेळी काळे यांनी भाजपाची साथ केली. सहाजिकच त्यावेळीही पवार नाराज होते व त्यांनी पुण्याच्या पत्रकार परिषदेतही याचा उल्लेख केला होता तर अजित पवार यांनी काळे यांच्या कारखान्याला केलेल्या एका मदतीबाबत भाष्य केले होते.

यानंतर विधानसभा निवडणूक पार पडली. मात्र शिवसेनेने भाजपाची साथ सोडल्याने दोन्ही काँग्रेसमधून भाजपात आलेल्यांची मात्र गोची झाली आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार झाले आहेत तर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधानपरिषद मिळाली आहे. कल्याणराव काळे यांनी आपली राजकीय कारकिर्द बनविण्यासाठी माढा लोकसभा निवडणुकीत भाजपाची साथ केली आहे. कारण ते माढा विधानसभेला ते आमदार बबनराव शिंदे यांचा विरोध करतात. अशावेळी लोकसभेला त्यांच्याच बंधूंचा प्रचार ते कसा करणार? हा मोठा प्रश्‍न होता.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर अनेक नेते असे आहेत ज्यांना विनाकारण विरोधात बसण्याची वेळ आली आहे. यात सध्या कल्याणराव काळे यांचा समावेश आहे. जर ते काँग्रेसमध्ये असते ते सत्ताधारी राहिले असते. त्यांच्या साखर कारखान्यांना सध्याच्या शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. सतत आंदोलन सुरू आहेत. मागील वर्षी कारखाना बंद होता तर यंदा अद्याप बॉयलर पेटलेला नाही. 15 ऑक्टोंबरपासून यंदाचा गळीत हंगाम राज्यात सुरू आहे. विठ्ठल परिवारातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरू होत आहे. मात्र सहकार शिरोमणी व सीताराम महाराज कारखान्याचे काय? असा सवाल शेतकरी विचारत आहेत.

कल्याणराव काळे यांच्यावर पवार यांची नाराजी लपून राहिलेली नाही. कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली यात त्यांनी काळे यांच्या कारखान्याकडून उसाचे पैसे मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याला थेट कारखान्यावर फौजदारी करण्याचाच सल्ला दिला आहे. दरम्यान मागील आठवड्यातच शरद पवार हे पंढरपूर दौऱ्यावर असताना त्यांची व काळे यांची आमदार भालकेंच्या निवासस्थानी भेट होवू शकली नाहीत. त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव बाहेर थांबावे लागले व तेथूनच ते परतले. यानंतर पुन्हा भालके यांनी फोन करून त्यांना साहेबांना भेटायला बोलाविले होते. याबाबत भालके यांनी प्रसिध्दीपत्रक काढून काळे हे भाजपात असले तरी विठ्ठल परिवारात आम्ही एकत्रच आहोत अशी सारवासारव केली आहे. दरम्यान आमदार भालके हे काळे यांच्या कारखान्याला मदत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करत असल्याचे सांगितले जात आहे. भालकेंची शिष्टाई सफल होते का? हे येत्या काळात दिसून येईल.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!