कृषिभूषण दत्तात्रय काळे उत्पादित   ‘किंगबेरी ‘ या नव्या द्राक्ष वाणाचे खा. शरद पवार यांच्या हस्ते 13 फेब्रुवारीला लोकार्पण

सोलापूर :- उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नजचे प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी द्राक्षमहर्षि स्वर्गीय नानासाहेब काळे यांच्या परिवाराने उत्पादित केलेल्या किंगबेरी या नव्या द्राक्ष वाणाचे लोकार्पण देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार शनिवार दि. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. नान्नज येथील द्राक्ष बागेत होणार असल्याची माहिती कृषिभूषण दत्तात्रय नानासाहेब काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर जिल्हा नेहमी दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रातील प्रगत असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा असला तरी नेहमी अवर्षणग्रस्त म्हणूनच या जिल्ह्याची ओळख आहे. अशा या दुष्काळग्रस्त त्यातही उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज परिसरात माळरानावर द्राक्षबागा फुलवून नवनवीन प्रयोग करीत नवे द्राक्षांच्या वाणांची निर्मिती करण्याचे भगीरथ यशस्वी प्रयत्न स्वर्गीय नानासाहेब सोनाजी काळे यांनी केले. स्वातंत्र्यपूर्व म्हणजेच सन 1939 मध्ये जन्मलेले नानासाहेब यांचे शिक्षण त्यावेळच्या मॅट्रिकपर्यत झालेले, परंतु एखाद्या संशोधकासारखे ते शेतात काम करीत पपई, कलिंगड यांची लागवड करून त्यांनी काळ्या मातीतून सोन्याचेच उत्पादन केले. त्यानंतर त्यांनी सन 1958 मध्ये पारंपारिक बिया असलेल्या द्राक्ष वाणांची बाग फुलवली. त्यानंतर सन 1964 मध्ये बारामती येथून द्राक्ष बागायतदार आण्णासाहेब शेंबेकर यांच्याकडून नानासाहेब काळे आणि त्र्यंबक तात्या दबडे या जोडीने द्राक्षवाण आणून थॉमसन सिडलेस हे वाण विकसित केले. सोलापूर जिल्ह्यात प्रथमच द्राक्षाची लागवड करण्याचा मानही स्वर्गीय नानासाहेबांनी मिळवला.

शेतीला सर्वस्व मानून त्यांनी द्राक्ष लागवडीत नवनवीन प्रयोग करण्यास सुरूवात केली. थॉमसन सिडलेस या द्राक्ष वाणामध्ये नैसर्गिक बदल घडून एक लांब मणी असणारी व दिसायला आकर्षक आणि खाण्यास वेगळी चविष्ट असलेले द्राक्षवाण विकसित करून त्याला सोनाका सिडलेस असे नामकरण केले. सोनाका मधून त्यांनी सोलापूर, आजोबाचे नाव, नान्नजचे नाव आणि आडनाव यातील अद्याक्षरे घेवून एक ब्रॅन्ड केला तोच सोनाका सिडलेस जगप्रसिध्द झाला.
महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील निवडक द्राक्ष बागायतदारांसाठी युरोप दौरा आयोजित केला त्या दौऱ्यात एका वेगळ्याच द्राक्षाने त्यांचे मन मोहून टाकले त्याचवेळी त्यांनी तेथील त्या द्राक्षाच्या काही काड्या घेवून आले आणि त्याचे लहान मुलासारखे संगोपन करीत रंगीत द्राक्ष वाण विकसित केले. युरोप दौऱ्याला जाताना देशाचे नेते शरद पवार यांनी केलेले मार्गदर्शन मनाला भावल्याने त्या वाणाला शरद पवार साहेबांचेच नाव देवून त्या रंगीत द्राक्ष वाणाला शरद पर्पल सिडलेस असे नामकरण दि. 4 फेेब्रुवारी 1990 रोजी राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते केले. हे द्राक्ष लोकप्रिय झाले शेतकऱ्यांना त्यातून मोठी अर्थप्राप्ती होऊ लागली. नानासाहेब काळे यांच्या या नव्या द्राक्ष वाणाची दखल घेत दि. 18 ऑगस्ट 1990 मध्ये वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा पुरस्कार देवून त्यांचा भव्य असा सत्कार झाला. वडिलांचे शेतीतील कष्ट आणि शेतीवरील प्रेम पाहून चिरंजीव दत्तात्रय आणि सारंग यांनीही शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला.
दत्तात्रय काळे यांनी वडिलांसोबत शेतात लक्ष देत वडिल नानासाहेब यांच्या प्रमाणेच शेतात प्रयोग करण्यास सुरूवात केली. त्यांनी पहिले वाण सन 2004 मध्ये उत्पादित केले ते सरीता पर्पल सिडलेस या नावाने प्रसिध्द केले. त्यानंतर नानासाहेब पर्पल सिडलेस हे वाण सन 2008 मध्ये विकसित केले. त्यानंतर सन 2016 मध्ये सोनाका सिडलेस मधून दनाका सिडलेस हे वाण विकसित केले. शेतात काम करताना त्यांना सर्वच आलबेल आहे असे झाले नाही निसर्गाची अवकृपाही त्यांना सहन करावी लागली. नेहमी दुष्काळी ठरलेल्या सोलापूर जिल्ह्यात पाण्याची टंचाई कायमचीच त्यात बागा जगावयाच्या म्हणून त्यांनी शेतापासून जवळपास 11 किलोमिटर असलेल्या हिप्परगा तलावातून मोठा खर्च करीत पाण्यासाठी पाइपलाइन करून घेतली दरम्यानच्या काळात बागा जगवण्यासाठी त्यांना टँकरच्या माध्यमातून पाणी द्यावे लागले.त्यातही प्रयोग करीत कमी पाण्यात बागा जगवण्यासाठी आणि जमीनीत ओल राहावी म्हणून त्यांनी विविध प्रयोग केले. लोकांना नवनवीन चवीचे, आकाराचे द्राक्ष देण्याची धडपड दत्तात्रय काळे यांनी पुढेही सुरूच ठेवली.
नवनवीन संशोधन करण्याची गोडी लावलेल्या द्राक्षाने दत्तात्रय काळे यांना वैशिष्ट्यपूर्ण निरीक्षणाची दृष्टीच दिली. द्राक्ष बागेतील प्रत्येक घडावर प्रयोग करून त्यांनी आपली निरीक्षक दृष्टी सिध्द केली. प्रत्येक नव्या वाणामध्ये वेगळे वैशिष्ट्ये होते. नवे वाण उत्पादन एवढेच शेतकऱ्याचे काम नाही तर त्या उत्पादनाचे मार्केटिंगही व्यवस्थित झाले पाहिजे. योग्य आणि आकर्षक पॅकिंग करून चांगली बाजारपेठ आपल्या उत्पादनाला मिळाली पाहिजे देशातील असो की परदेशातील ग्राहकांपर्यत आपल्या कष्टाचे हे फळ पोहोचले पाहिजे याचाही अभ्यास करीत दत्तात्रय काळे यांनी देशासह परदेशात जावून विविध द्राक्ष वाणांची पाहणी आणि अभ्यास केला. देशातील द्राक्ष बागायत क्षेत्रातील एकूण 60 टक्के द्राक्षांचे वाण हे सोलापूरच्या नान्नज येथील काळे परिवाराने निर्माण केलेल्या सोनाका, शरद सिडलेस या द्राक्ष वाणातूनच निर्माण झाले ही बाब सोलापूरच्या दृष्टीने अभिमानस्पद आहे.

यातूनच अनेक शेतकऱ्यांनी नवनवीन वाण उत्पादित करण्याची प्रेरणा घेवून द्राक्षबागांचे क्षेत्र मोठ्याप्रमाणात वाढवत अनेक वाण निर्माण केले. याचे सर्व श्रेय नानासाहेब काळे परिवाराला आहे. द्राक्षाचे तीन पेटंट घेवून चौथे पेटंट नव्याने विकसित केलेल्या किंगबेरीसाठी लवकरच पेटंट मिळणार असून अशा प्रकारे पेटंट घेणारे कृषीभूषण दत्तात्रय नानासाहेब काळे हे देशातील एकमेव शेतकरी आहेत.
प्रयोगशील, संशोधनवृत्तीची परंपरा कायम ठेवत दत्तात्रय काळे यांनी यंदाच्या दशकातील पहिल्याच वर्षात नवीन आणि वैशिष्ट्यपूर्ण असे नवे वाण उत्पादित केले आहे. नियमित द्राक्षापेक्षा आकाराने, वजनाने मोठा असलेला आणि शेतकऱ्यांना सधन करणाऱ्या नव्या किंगबेरी या द्राक्ष वाणाची निर्मिती केली. या किंग बेरी द्राक्ष वाणाचे राष्ट्राला लोकार्पण देशाची माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते शनिवार दि. 13 फेब्रुवारी 2021 रोजी नान्नज येथे काळे यांच्या द्राक्ष बागेत एका कार्यक्रमात होणार आहे. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी मंत्री दादा भुसे, सहकार व पणन मंत्री शामराव पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तर सोलापूरचे खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी,आ.बबनदादा शिंदे, आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख,आ.प्रणिती शिंदे, आ.यशवंत माने, आ. संजयमामा शिंदे,आ.प्रशांत परिचारक, आ. अनिल बाबर, आ. रोहित पवार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायत संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, उपाध्यक्ष शिवाजीराव पवार,खजिनदार कैलास भोसले, अखिल भारतीय द्राक्ष बागायत संघाचे अध्यक्ष सोपान कांचन, मध्यवर्ती विज्ञान समितीचे चेअरमन अरविंद कांचन, माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, माजी आ. अर्जुन खोतकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

किंगबेरी बद्दल…
1) ह्या व्हरायटीची पाने स्वॉफ्ट असल्यामुळे सायटोकायनीनची निर्मिती चांगली होते. त्यामुळे फळधारणा उत्तम होते.
2) झाडावरील प्रत्येक काडीला हमखास 2 ते 3 घड लागतात.
3) पानांचा आकार मोठा व पानांचा रंग लाईट हिरवा.
4) काडीपासून घडाचा देठ लांब, दोन पाकळ्यातील अंतर जास्त असल्यामुळे थिनींगचा खर्च कमी येतो.
5) घडांचा दांडा लुसलशीत असल्यामुळे संजिवकांना प्रतिसाद चांगला मिळतो.
6) नैसर्गिक लांबी व फुगवण असल्यामुळे संजिवकांचा वापर कमी त्यामुळे कोणतीही विकृती निर्माण होत नाही,
त्यातून द्राक्षाची गोडी, चव आणि रंग नैसर्गिक मिळतो
7) घडातील द्राक्षमणी एकसारख्या आकाराचे मण्यांची लांबी 45 ते 50 मिमि पर्यत व जाडी 24 ते 25 मिमी पर्यत तसेच खाण्यास क्रंन्ची.
8) भारतीय बाजारपेठ व परदेशी निर्यातीसाठी इतर रंगीत द्राक्ष वाणांपेक्षा 25 ते 30 टक्के ज्यास्त दर मागील वर्षी मिळाला.
9) एकरी 12 ते 14 टन एकूण उत्पन्न देणारे हे पहिलेच रंगीत किंग बेरी द्राक्ष वाण आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!