कोरोनाकाळात स्वराज चव्हाण व मित्रांनी तयार केलेला रोबोट ठरतोय वरदान
संतोष भोसले
अकलूज – स्वराज चव्हाण यांनी व त्यांच्या मित्रांनी कल्पकतेच्या जोरावर जगाला मारक ठरणाऱ्या कोरोनावर मात करणारा रोबोट तयार केला असून तो या काळात हा श वरदान ठरताना दिसत आहे.
कल्पकतेला बुद्धिमत्तेची जोड असल्यावर अशक्य ते शक्य होऊन जाते. बुद्धिमत्ता ही निसर्गाने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे आणि याच्या बळावरच मानव अनेक संकटावर मात करीत पुढे सरसावताना दिसत आहे. सध्या कोरोनाचे महाभयंकर संकट जगावर ओढवले आहे. प्रत्येक जण काळजी घेत सुरक्षित अंतर ठेवत जीवन जगताना दिसत आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना जीवन भयग्रस्त झाले आहे. एकमेकाला स्पर्शही न होवो इतकी काळजी घेतली जात आहे. अनेक योद्धे जीवाची पर्वा न करता असंख्य रुग्णावर उपचार करीत आहेत.
हे उपचार करीत असताना योग्य ती ते काळजी घेत असले तरी अलीकडील काळात योध्यानाच कोरोनाची लागण होताना दिसत आहे. आणि हीच समस्या हेरत आपल्या बुद्धिचातुर्यच्या जोरावर रुग्णांना स्पर्शही होणार नाही आणि योग्य इलाजही करता येईल अशी व्यवस्था निर्माण करण्याचा विचार स्वराज चव्हाण आणि त्यांच्या मित्राच्या डोक्यात आला. तत्काळ त्यांनी बुद्धिमत्तेला कल्पनांची जोड देत रोबोट तयार करण्याचा विचार केला. आणि ध्यासाने प्रेरीत होत दूत रोबोट तयारही झाला.
स्वराज चव्हाण आणि त्यांचे सहकारी अक्षय रेवणकर, ऋषभ चौगुले, पूजा काशीद, अभिषेक सुतार, मैत्रेय गोखले यांनी सांगली जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चाही केली आणि अपेक्षेप्रमाणे रोबोट रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णालयात अवतरला. एकदा चार्ज केल्यानंतर हा रोबोट दिवसभरात जवळपास तीस रुग्णांना परिपूर्ण सेवा देण्यात सज्ज होतो. त्यामुळे रुग्णांचा आणि इतरांचा संपर्कही येऊ शकत नाही व उपचार पद्धती ही सहजतेने करता येते . या रोबोटच्या माध्यमातून व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे रुग्णांच्या अडीअडचणी ही जाणून घेता येतात. एकमेकाशी संवाद साधता येत असल्याने सुलभ उपचार पद्धती राबवता येते. रुग्णांना आपल्या व्यथा निर्विवादपणे मांडता येतात.त्यामुळे सध्याच्या भीतीयुक्त कोरोनाकाळात हा दूत रोबोट वरदान ठरताना दिसत आहे.
याशिवाय या रोबोट चा उपयोग अतिदक्षता विभागामध्ये बर्न रुग्णांना उपचार करण्यासाठी किंवा ज्याठिकाणी इन्फेक्शन्स असतात त्या ठिकाणी याचा उपयोग अगदी देवदुता प्रमाणे होऊ शकतो. सध्या हा रोबोट मिरज येथे कार्यरत असला तरी राज्यातील विविध भागात याचा उपयोग होऊ शकतो. आणि या माध्यमातून संसर्गजन्य रुग्णांना योग्य तो उपचार पद्धती अगदी सुरक्षित राहून आपण देऊ शकतो. हा रोबोट निर्माण केल्याने याचा उपयोग सध्याच्या काळातील कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी केला गेला पाहिजे अशा भावनाही यानिमित्ताने स्वराज्य चव्हाण यांनी व्यक्त केलु.
स्वराज चव्हाण हे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय सूर्यकांतदादा माने देशमुख व स्व. चंद्रकांत दादा माने देशमुख तसेच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांचे नातू आहेत. महादेव देवालय ट्रस्ट वेळापूरचे अध्यक्ष अमृतभैय्या माने देशमुख, विकास सोसायटी वेळापूरचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख व सहकार महर्षी कारखान्याचे सेक्रेटरी अभयसिंह माने देशमुख यांचे ते भाचे आहेत. त्यांनी घेतलेल्या या यशस्वी भरारीबाबत माळशिरस तालुक्यातूनच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत आहे.