कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मंदावली

पंढरपूर -कोरोना विषाणूचे संकट राज्यभर वाढू लागल्याने आता राज्यातील प्रसिद्ध मंदिरात दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी ओसरू लागली असल्याचे चित्र आहे. राज्यात ठिकठिकाणी कोरोनाची रूग्ण संख्या वाढत चालल्याने मागील आठवड्यापासून पंढरीच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात रोज तीन हजाराच्या आसपासच भाविकच दर्शनासाठी येत आहेत.

एरव्ही येथे दर्शनासाठी मोठी गर्दी असते. कोरोना प्रादुभार्वाच्यापूर्वी येथे रोज तीस ते चाळीस हजार भाविक हजेरी लावत तर महिन्याच्या व पंधरा दिवसाच्या एकादशी व अन्य सणावाराला ही संख्या एक लाखाच्या घरात असायची. मात्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर 17 मार्च 2020 ला हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद झाले व उघडले 16 नोव्हेंबर 2020 ला तब्बल आठ महिन्यानंतर. या काळात सर्व यात्रा व सणवार प्रतीकात्मक स्वरूपात येथे साजरे झाले.

दर्शन पुन्हा सुरू झाल्यानंतर ते मुखदर्शन स्वरूपात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे पदस्पर्श दर्शन बंद असून भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर पुन्हा सुरू करताना ऑनलाइन बुकींग सक्तीचे होते. सुरूवातीला एक हजार भाविकांनाच दर्शन मिळत होते ते वाढवत 8 हजारापर्यंत नेण्यात आले. स्थानिक लोकांना दर्शनाची वेळ देण्यात आली होती. यानंतर ऑनलाइन बुकींगची अट शिथील करून ओळखपत्र पाहून दर्शनाला सोडले जावू लागले. त्यावेळी जवळपास वीस ते पंचवीस हजार भाविक रोज दर्शनाला येत होते. आता सा सुरळीत होत असताना राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने आता भाविकांनीच दर्शनाला येणे कमी केल्याचे चित्र आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अनेक जिल्ह्यात व शहरांमध्ये असल्याने काही कडक निर्बंध लादण्यात आले आहे. यामुळे तीर्थक्षेत्रांमधील गर्दी ही कमी होवू लागल्याचे चित्र आहे.

गेल्या आठ दिवसात भाविकांची संख्या येथे मंदावत असल्याचे मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले. ते म्हणाले, ऑनलाइन बरोबरच आपण जेंव्हा ओळखपत्र पाहून भाविकांना दर्शनासाठी सोडण्याचा निर्णय घेतला तेंव्हा रोज 20 हजार भाविक दर्शन घेत होते. मात्र मागील आठ दिवसांचा विचार केला तर भाविकांच्या संख्येत घट असून रोज तीन हजाराच्या आसपास भाविक येथे येत आहेत. सध्या दहावी, बारावी व अन्य वर्गांच्या परीक्षांची तयारी ठिकठिकाणी सुरू असल्याने तसेच कोरोनाचे वाढती रूग्ण संख्या पाहता येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत घट झाली असावी असे वाटते.

कोरोनाचे वाढते रूग्ण, याचबरोबर मोठ्या शहरांमधील याचा वाढता प्रादुर्भाव तसेच सोलापूर जिल्हा व पंढरपूरमध्ये ही कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी, रात्रीची पुकारण्यात आलेली संचारबंदी यामुळे भाविकांनी दर्शनासाठी सध्या पंढरीत येणे कमी केले असावे असा अंदाज सारे व्यक्त करत आहेत. माध्यमांमधून कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येची चर्चा सतत सुरू असते. यामुळे गावोगावी ही माहिती सहज उपलब्ध होत असल्याने ग्रामीणमधूनही येथे येणारे भाविक आता घरीच राहणे पसंत करू लागले आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!