कोरोनाचा शेतीला फटका, दर कोसळल्याने फळ उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान
पंढरपूर – मागील वर्षी मार्च महिन्यात सुरू झालेले कोरोनाचे संकट एक वर्षे झाले तरी अद्याप संपलेले नाही. याचा परिणाम सर्वच उद्योगावर झाला तसा शेतीवरही दिसून आला. पुन्हा कोरोनाचे रूग्ण वाढल्याने राज्यात काही ठिकाणी कडक निर्बंध लादले गेले आहेत. यामुळे सहाजिकच पुन्हा लॉकडाउनच्या चर्चा पसरविल्या जावू लागल्या आहेत व याचा परिणाम हा नगदी पीक असणाऱ्या द्राक्ष व डाळिंबाच्या दरावर झाला आहे.
या फळांचे दर सोलापूर जिल्ह्यात किमान 25 टक्के कमी झाले असून यामुळे पंढरपूर, सांगोला , माढा व अन्य भागातील बागायतदार शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे शेतीचे मोठे नुकसान मागील वर्षी पाहावयास मिळाले. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कडक टाळेबंदी पुकारली जात होती. यातून भाजीपाला व दूध हे जरी शहरांमध्ये पाठविले जात होते मात्र याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी मध्यस्थ व्यापाऱ्यांनाच मोठ्या प्रमाणात झाला. कमी दरात भाजीपाला ग्रामीणमध्ये खदी करून तो निम शहर व मोठ्या शहरांमध्ये चढ्या दराने विक्रीचे प्रकार सर्रास घडले होते.