नवी दिल्ली- राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे हे राजधानी नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या भेटीला पोहोचले असून ते केंद्र सरकारला प्रत्येक आठवड्याला महाराष्ट्राला कोरोना प्रतिबंधक लसीचे 20 लाख डोज मागणार आहेत.
राज्यात कोरोनाचे रूग्णसंख्या आटोक्यात आली होती मात्र मागील पंधरा दिवसात झपाट्याने रूग्ण वाढत आहेत. याबाबत बोलताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, राज्यात प्रतिदिन रूग्णांचा आकडा तीन हजार इतका खाली होता मात्र मागील आठ ते दहा दिवसात ही संख्या झपाट्याने वाढली आहे. काल पंधरा हजाराहून अधिक कोरोनाबाधित एकाच दिवशी नोंदले गेले आहेत. जरी रूग्ण वाढत असले तरी यापैकी बहुतांश हे सौम्य लक्षणांचे आहेत. त्यांच्यावर घरीच विलगीकरणात उपचार होत आहेत.
राज्यातील रूग्णालयात बेडस् मुबलक प्रमाणात उपलब्ध असून ऑक्सिजन व आयसीयू बेडची कमरता नाही. सध्या जरी रूग्ण वाढत असले तरी आत्ताचा मृत्यूदर हा 0.50 टक्के इतका आहे. तसेच रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के इतके वाढले आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारने कालच काही कडक नियम लागू केले आहेत.
राज्यातील वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता सध्या सुरू असणा लसीकरण वेगाने होण्यासाठी प्रति आठवडा किमान वीस लाख डोज मिळावेत अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे आपण करणार आहोत. ते याबाबत सकारात्मक विचार करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.