कोरोनाची सौम्य किंवा लक्षण न दिसणार्‍यांना घरीच विलगीकरणात राहून उपचार घेता येणार

मुंबई – कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह असलेले परंतु अति सौम्य किंवा लक्षण न दिसणार्‍या रूग्णांना त्यांच्याच घरी विलगीकरण करून उपचार करण्याबाबत मार्गदर्शक सूचना राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केल्या आहेत.
भारत सरकारच्या 7 एप्रिल 2020 च्या संदर्भा अन्वये कोविड 19 संशयित किंवा पॉझिटिव्ह असलेल्या रूग्णांसाठीच्या मार्गदर्शक सूचना यापूर्वीच निर्गमित झाल्या असून त्यानुसार सर्व संशयित व पॉझिटिव्ह रूग्णांना रूग्णालयांमध्ये विलगीकरणासह योग्य व्यवस्थापनाद्वारे आजाराचे संक्रमण खंडीत करण्याचे सूचित केले आहे. प्रचलित मार्गदर्शक सूचनेनुसार वैद्यकीयदृष्ट्या लक्षण नसलेले अथवा सौम्य व अतिसौम्य लक्षणे , मध्यम लक्षणे , तीव्र लक्षणे असे वर्गीकृत करावयाचे असून अशा रूग्णांना कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे दाखल करायचे आहे. तथापि, रूग्णांमध्ये अतिसौम्य किंवा लक्षणे नसतील तर रूग्णांच्या संमतीनुसार होम आयसोलेशचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाने जारी केल्या असून यात उपचार करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांनी रूग्णास अति सौम्य किंवा लक्षणे नसल्याचे प्रमाणित करणे बंधनकारक आहे. संबंधित रूग्णाच्या घरी विलगीकरणाची योग्य सोयी सुविधा आवश्यक आहे. घरीच दिवसरात्र काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध असावी. काळजीवाहू व्यक्ती व संबंधित रूग्णालय यांच्यामध्ये संपर्क व्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या सल्ल्यानुसार काळजीवाहू व्यक्ती व निकट संपर्कातील व्यक्तींनी प्रोटोकॉलनुसार हायड्रॉक्सिक्लोरोक्विन ची मात्रा घ्यावी. मोबाईलवर आरोग्यसेतू अ‍ॅप डाऊनलोड करावे व ते सतत अ‍ॅक्टिव्ह असावे. रूग्णांनी स्वतःची काळजी घेणे व नियमितपणे प्रकृतीबाबत पाठपुराव्या विषयी जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी/ सर्व्हेक्षण पथकास माहिती देणे आवश्यक आह. रूग्णांनी स्वतःचे गृह विलगीकरणाविषयी प्रतिज्ञापत्र भरून द्यावे व सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर सदर व्यक्तीस गृह विलगीकरणासाठी पात्र ठरविण्यात येईल.
रूग्णाने स्वतः व काळजीवहू व्यक्तींनी त्याच्या आरोग्यावर लक्ष ठेवावे व पुढीलपैकी कोणतेही गंभीर लक्षण आढळून आल्यास त्वरीत वैद्यकीय मदत घ्यावी यात धाप लागणे, श्‍वासोश्‍वासास अडथळा निर्माण होणे, छातीत दुखणे अथवा वेदना होणे, संभ्रमावस्था अथवा शुध्द हरपणे, ओढ व चेहरा निळसर पडणे, उपचार करणार्‍या वैद्यकीय संदर्भ सेवेची गरज पडणे. याचा समावेश आहे.
गृह विलगीकरणात ठेवलेल्या व्यक्तीस लक्षणे सुरू झाल्यानंतर 17 दिवसानंतर किंंवा रूग्णाला लक्षणे नसल्यास चाचणीसाठी ज्या दिवशी नमुना घेतला आहे तेथून 17 दिवसानंतर आणि मागील 10 दिवसांपासून ताप येत नसेल तर गृह विलगीकरणातून व्यक्तीस मुक्त करावे. हा काळ संपल्यानंतर परत कोविड 19 साठी चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!