कोरोनाच्या दुसर्या लाटेत पंढरीचे अर्थकारण वाहून जातयं ! , यंदाही वारी रद्द दुकानदारांची अवस्था बिकट
राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी www.vedhak.com ला जरुर भेट द्या.
पंढरपूर- कोरोनाचा कहर सुरू होवून पंधरा महिन्याहून अधिकचा काळ लोटला असून यात संसर्ग रोखण्यासाठी बहुतांश वेळा पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर बंदच ठेवावे लागले आहे. यामुळे भाविकांवर चालणार्या या शहराचे अर्थकारण पारच बिघडले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत तोटा सहन करून तग धरून राहिलेला येथील व्यापार आता दुसर्या लाटेत पुरता वाहून जातो की काय? काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
यंदाची आषाढी वारी भरणार नाही हे निश्चित झाले आहे. पायी पालखी सोहळ्यांना परवानगी नाही. बसेसमधून मानाच्या दहा पालख्या पंढरीत येतील व अवघ्या 36 तासात त्या परतीच्या प्रवासाला लागणार आहेत. या आषाढीतही भाविक पंढरीत येवू शकणार नाहीत. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अत्यंत प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागात याचा कहर मोठ्या प्रमाणात आहे. आजही पंढरपूर व अन्य तालुक्यांमध्ये रूग्ण आढळून येत आहेत. जरी प्रशासनाने काही अटी शिथिल करून व्यापार सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी पंढरपूरमधील मंदिर परिसरात सध्याही नीरव शांतता असते. मंदिर बंद असल्याने भाविकांविना रस्ते ओस आहेत. व्यापारी दुकानं उघडतात पण ग्राहकांची त्यांना प्रतीक्षा आहे.
शहरात अन्य दुकानांना स्थानिक ग्राहकांवर अवलंबून राहावे लागत आहे. यापूर्वी भाविकांच रेलचेल असल्याने हॉटेल, लॉज, धर्मशाळा यासह अन्य दुकाने चालत होती. मात्र भाविकांविना येथील व्यवसाय मंदावला आहे. याचा सर्वाधिक फटका मंदिर परिसरातील लहान मोठ्या व्यावसायिकांना बसला आहे. प्रासादिक वस्तू, पूजेची साहित्य, ग्रंथ, वाद्य, पितळी मूर्ती यासह तुळशी माळा, फोटा, फुले यांना मागणीच नाही. कोरोनाची ही परिस्थिती आणखी किती काळ चालणार?याकडे सार्यांचे लक्ष आहे.