कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीत पार पडला माघ एकादशीचा सोहळा
पंढरपूर, दि.23 – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा माघ एकादशीचा सोहळा तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये संचारबंदीत पार पडला. विना भाविक विठुरायाची नगरी सुनसान दिसत होती. लागोपाठ चौथ्या यात्रेवर कोरोनाचे सावट होते. दरम्यान होणाऱ्या भक्तांच्या गर्दीची शक्यता व कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता उद्या द्वादशी दिवशीही विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
माघ वारीत जिल्हा प्रशासनाने एकादशीसाठी एक दिवसाची संचारबंदी पुकारली होती. तर मंदि समितीने दशमी व एकादशी दिवशी विठुरायाचे दर्शन बंद ठेवले होते. आता बुधवारी द्वादशीला ही भाविकांना पंढरीत दर्शन मिळणार नाही. कोरोनाचा प्रभाव राज्यात वाढत असून अनेक ठिकाणी कडक निर्बंध लावले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर माघी यात्रा होत आहे.
2020 च्या एप्रिलमध्ये पहिल्यांदा चैत्री यात्रेवर कोरोनाचे संकट घोंघावले होते. तेंव्हा यात्रा रद्द करण्यात आली होती. यानंतर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच गेल्याने आषाढी, कार्तिकी यात्रांवर याचे सावट पसरले होते. आत नवीन वर्षात माघ वारीवरही निर्बंध आणण्याची वेळ प्रशासनाला आली. दरम्यान संचारबंदी काळात पंढरपूरमध्ये नीरव शांतता होती. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त शहराबाहेर व आत तैनात करण्यात आला होता.
पहाटे श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदि समितीच्या सदस्या ॲड. माधवी निगडे यांनी तर रूक्मिणी मातेची पूजा ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी केली. दरम्यान मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी एक टन फुलांची सजावट करण्यात आली. पुण्याचे भक्त सचिन चव्हाण, संदीप पाटील व योगेश सोनार यांनी ही आरास दिली होती. याच बरोबर मंदिराला आकर्षक रोषणार्इ करण्यात आली आहे. सकाळी प्रथा परंपनुसार मोजक्या दहा बारा भाविकांसह नगरप्रदक्षाि करण्यात आली.