कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघी यात्रा कालावधीत आवश्यक उपाययोजना करण्याबाबत प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या सूचना
पंढरपूर, दि. 16:- माघी यात्रा कालावधीत राज्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोरोना विषाणू ससंर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच ही वारी सुरक्षित व सुरळीत पार पाडण्यासाठी संबधित विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचना प्रातांधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.
माघ वारी नियोजनबाबत सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस तहसीलदार विवेक साळुंखे, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, अन्न औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त प्रदीपकुमार राऊत, पोलीस निरीक्षक अरुण पवार, किरण अवचर,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरविंद गिराम, बांधकाम विभागाचे उपअभियंता हनुमंत बागल याच्यांसह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी ढोले म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत असताना, मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. माघ वारी ही कोरोनाच्या संकटकाळात पार पडत आहे. याबाबत सर्व संबधित विभागांनी आपणास दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवण्याबाबत आरोग्य विभागाने नियोजन करावे. तसेच इतर साथीच्या आजारांच्या प्रतिबंधासाठी मुबलक औषधसाठा ठेवावा. आवश्यक ठिकाणी प्रथमोचार केंद्राची उभारणी करावी.
नगपालिकेने स्वच्छ पिण्याचे पाणी तसेच आवश्यक तिथे बॅरेकेटींग करावे. मंदिर परिसर, नदीपात्रातील वाळवंट, 65 एकर परिसर स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. तसेच शहरात आवश्यक ठिकाणी निर्जंतुकीकरासाठी औषध फवारणी करुन घ्यावी अशा सूचनाही श्री.ढोले यांनी यावेळी दिल्या.
मंदिर समितीने दर्शन मंडप, मंदीर परिसर स्वच्छ राहील याबाबत दक्षता घ्यावी. दर्शन रांगेत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. आवश्यक ठिकाणी मंदीर समिती व नगपालिका यांनी बॅरेकेटींग करावे. सी.सी.टीव्ही यंत्रणा सुसज्ज ठेवावी. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने चंद्रभागा नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा अखंडीत राहील याबाबत दक्षता घ्यावी. पोलीस विभागाने सुरक्षिततेसाठी आवश्यक बंदोबस्त प्राप्त करुन घ्यावा. तसेच यात्रा कालावधीत वाहतुक व्यवस्था सुरळीत राही याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही श्री.ढोले यांनी यावेळी दिल्या.
यावेळी बैठकीत अन्न व औषध प्रशासन, राज्य परिवहन महामंडळ, उपप्रादेशिक परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, सार्वजनीक बांधकाम आदी विभागांचा आढावा घेण्यात आला.