कोरोनामुळे मंदिर बंद मात्र नित्योपचार म्हणून बुधवारपासून श्री विठ्ठलाचे 24 तास दर्शन
पंढरपूर, दि.22 – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी 30 जूनपर्यंत बंद असले तरी नित्योपचार हे परंपरेनुसार सुरू आहेत. यातच आता आषाढी यात्रा आली असून या कालावधीत श्रींचे चोवीस तास दर्शन सुरू असते व हा नित्योपचाराचा भाग असल्याने बुधवार 24 जून रोजी सकाळी सात वाजता देवाचा पलंग काढण्यात येणार आहे. अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
दरम्यान भाविकांच्या सोयीसाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने ऑनलाइन दर्शनाची सोय करण्यात आली आहे तसेच विठ्ठलरूक्मिणी दर्शन अॅप यासह जिओ टीव्हीवरील जिओ दर्शन व टाटा स्काय डिशवरील अॅक्टिव चॅनेलवर ही देवाचे दर्शन थेट सुरु आहे.
आषाढी यात्रा ही आषाढ शुध्द 1 ते पौर्णिमेपर्यंत भरतेे. यंदा 1 जुलै रोजी आषाढी एकादशी असून पौर्णिमा 5 जुलै रोजी आहे. आज 22 जून पासून आषाढी सुरू झाली आहे. आता आषाढ शुध्द 3 बुधवारी सकाळी सात वाजता श्रींचा पलंग काढला जाईल व श्री विठ्ठल व रूक्मिणी माता दर्शन देण्यासाठी चोवीस तास उभेच राहणार असल्याने त्यांना मऊ कापसाचा तक्क्या दिला जाणार आहे. या कालावधीत पहाटे चार ते पाच दरम्यान श्रींची नित्यपूजा, सकाळी 10.45 ते 11.15 या कालावधीत महानैवेद्य, रात्रौ साडेआठ ते नऊच्या दरम्यान लिंबूपाणी असे नित्योपचार होणार आहेत.
कोरोनाचा संसर्ग असल्याने पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर हे भाविकांच्या दर्शनासाठी 17 मार्च ते 30 जून 2020 या कालावधीत बंद ठेवण्यात आले आहे. जरी मंदिर बंद असले तरी देवाचे सर्व नित्योपचार हे नेहमीप्रमाणेच पार पाडले जात आहेत. याच अंतर्गत आता आषाढी यात्रा आली असल्याने दर्शन भाविकांसाठी बंद जरी असले तरी नित्योपचार परंपरेप्रमाणे होतच राहणार आहेत. आषाढीतील देवाचे चोवीस तास दर्शन हा नित्योपचारातील भाग आहे.