कोरोनामुळे यंदा पौर्णिमेची देव व संतभेट द्वादशीलाच
पंढरपूर, – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यंदा आषाढी यात्रा भरली नाही. मानाच्या पालख्या दशमीला पंढरपूरला आल्या आणि गुरूवारी 2 जुलै रोजी द्वादशीलाच त्या परत गेल्या. दरवर्षी पौर्णिमेला होणारा देव व संतांच्या भेटीचा सोहळा यंदा द्वादशीलाच झाला. सकाळी सात वाजता यास सुरूवात झाली. मंदिरे समितीच्या वतीने प्रत्येक पालखीस अर्धा तासाची वेळ ठरवून देण्यात आली होती.
दरम्यान प्रत्येक पालखी समवेत शासनाने वीस भाविकांना पंढरपूरमध्ये येण्याची परवानगी दिली होती. या सर्वांना आज श्री विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन घेण्यास परवानगी देण्यात आली होती. यापूर्वी केवळ पाच जणांना मंदिरात येण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र पालखी सोहळा प्रमुखांच्या आग्रहानंतर प्रशासनाने व मंदिरे समितीने मंदिरात संत व देव भेटीवेळी पादुकांसमवेत 18 जणांना तर नंतर दुपारी नैवेद्य दाखविताना दोन जणांना परवानगी दिली.
सकाळी सात वाजता संत व देवभेटीस सुरूवात झाली. प्रारंभी पैठणहून आलेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीने मंदिरात प्रवेश केला होता. यानंतर त्र्यंबकेश्वर येथून आलेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखीने विठ्ठल मंदिरात प्रवेश केला. यानंतर चांगवटेश्वर देवस्थान सासवड, सोपानदेव पालखी सासवड, संत मुक्ताई पालखी मुक्ताईनगर, विठ्ठल रख्माई देवस्थान कौंडण्यपूर, संत तुकाराम महाराज पालखी श्रीक्षेत्र देहू, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी श्रीक्षेत्र आळंदी व शेवटी संत नामदेव महाराज पालखीचे आगमन झाले. दुपारी बारा वाजेपर्यंत मानाच्या पालख्या (पादुका) मंदिरात येत होत्या. येथे संत व देवाची भेट घडविण्यात आली. पालख्यांचे स्वागत मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले.