कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे: आमदार भालके
पंढरपूर, दि.08:पंढरपूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांनी सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आमदार भारत भालके यांनी केले आहे.
तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील वाढती रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रशासनाच्या वतीने मोफत रॅपिड ॲंटीजेन टेस्टची मोहीम सुरु करण्यात आली आहे, नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी. कोरोना विषाणूच्या आजाराबाबत नागरिकांनी घाबरुन न जाता आरोग्य विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार दक्षता घ्यावी. आजाराबाबत कुठलीही माहिती लपवू नये. स्वत:ची व कुटूंबाची तसेच जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी व कोरोनाचा प्रसार रोखण्यास प्रशासनास सहकार्य करावे, असेही आमदार भालके यांनी सांगितले.
आतापर्यंत सर्वांनी सहकार्य केले आहे. पोलीस यंत्रणा, प्रशासन, आरोग्य सेवा बजावणारे डॉक्टर्स, कर्मचारी यांना असेच सहकार्य कायम ठेवून आपण सर्वजन मिळून या संकटावर मात करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.