कोरोना प्रतिबंधक लसीकरणात जिल्ह्यावर अन्याय, सर्वपक्षीय आमदार जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार : आमदार प्रशांत परिचारक

पंढरपूर- मागील आठ दिवसात पुणे विभागासाठी दोन लाखाहून अधिक लस मिळाल्या परंतु सोलापूर जिल्ह्यास एक बाटली देखील मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांना बरोबर घेवून जिल्हाधिकारी यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात सुरू असताना सोलापूर जिल्हात मात्र मागील आठ दिवसापासून लसीकरण ठप्प आहे. सुरूवातीपासूनच पुणे विभागातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्याला अत्यंत कमी लस मिळत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ठ होत आहे. दरम्यान लसीकरण ठप्प असल्याने जेष्ठांसह तरूणांच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेकांनी पहिला डोस घेवून तीन महिने लोटले तरी त्यांना लस मिळत नाही. दरम्यान याबाबत परिचारक यांनी सोमवारी संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेतली. यामध्ये लसच मिळत नसल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ठ केले.
केंद्राकडून राज्यास मंजूर लसीचे विभागानुसार वाटप होत आहे. पुणे विभागास मागील आठवड्यात २ लाखाहून अधिक लस प्राप्त झाल्या. या पैकी सव्वा लाख एकट्या पुणे जिल्ह्यास, २५ हजार सातारा, ३० हजार कोल्हापूर तर २० हजार सांगली जिल्ह्यास लस प्राप्त झाल्या आहेत. तर सोलापूर जिल्ह्यास लसीची एक बाटली देखील मिळाली नाही. यापूर्वी जिल्ह्यासाठी १२ ते १३ हजार लस प्राप्त होत आहेत. यातून प्रत्येक तालुक्याच्या वाट्याला केवळ १ हजार लस मिळत आहे. लसीकरणाबाबत सोलापूरवर दुजाभाव केला जात असल्याचा आरोप परिचारक यांनी केला. यासाठी मी पुन्हा जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांशी संपर्क साधत असून जिल्हाधिकारी यांना भेटून वस्तुस्थिती मांडणार असल्याचे सांगितले. याबाबत शासनास हलवावे लागेल असा इशारा त्यांनी देत यापूर्वी देखील लस व रेमडेसिवीर इंजक्शन साठी आम्ही आंदोलन केले असल्याची आठवण परिचारक यांनी करून दिली.
दरम्यान लसीकरणाचा वेग मंदावला असतानाच पंढरीतील आषाढीवारी तोंडावर आली आहे. यात्रेवर बंदी असल्याने सध्या मोठ्या संख्येने भाविक पंढरीत येवून संत नामदेव पायरीचे दर्शन घेत आहेत. काही दिवसापूर्वी पार पडलेल्या महिन्याच्या एकादशीला तर २५ हजार भाविकांनी शहरात हजेरी लावली होती. आषाढ महिन्यात भाविकांची संख्या वाढणार आहे. यामुळे येथे जलदगतीने लसीकरण करण्याची गरज आहे. मागील वर्षी आषाढी नंतरच पंढरीत कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती.
ऐकीकडे लसीकरण ठप्प असताना शहर व तालुक्यात कोरोनाच्या टेस्ट देखील कमी होत असल्याची माहिती परिचारक यांनी दिली. यापूर्वी दिवसाला एक हजारहून अधिक कोरोना टेस्ट केल्या जात होत्या. परंतु सध्या दिवसाला २०० ते २५० टेस्ट होत आहेत. टेस्ट कमी झाल्या असून कोरोना पॉझिटीव्ह रेट २४ टक्के पर्यंत वाढला आहे. १४ टक्के वरून कोरोनाचा पॉझिटिव्ही रेट २४ टक्के पर्यंत जाणे अत्यंत गंभीर असून भविष्यात रूग्णांची संख्या वाढण्याचे हे संकेत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. नागरिक देखील बेफिकीर झाले असून प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन आमदार परिचारक यांनी केले.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!