कोरोना प्रतिबंधासाठी पंढरपूर नगरपरिषदेची जय्यत तयारी

शहरात आलेल्यांनी आपल्या नोंदी पालिकेत करण्याचे आमदार प्रशांत परिचारक यांचे आवाहन
पंढरपूर, दि. 26- कोरोना व्हायरस संदर्भात बाहेर गावातून पंढरपूर शहरात येणार्‍या नागरिकांच्या नोंदी नगरपरिषदेमध्ये कराव्यात तसेच कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन आमदार प्रशांत परिचारक यांनी केले.
कोरोना व्हायरसला आळा घालणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी नगराध्यक्षा साधना भोसले, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव व आमदार परिचारक यांनी नगरसेवकांसमवेत नुकतीच बैठक घेतली. यावेळी बोलताना परिचारक यांनी कोरोना संबंधी नगरपरिषदेने करावयाच्या उपाय योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, देश-विदेश व परराज्यातून, परजिह्यातून आलेल्या नागरिकांच्या नोंदी नगरपरिषदेने ऑनलाईन नोंदवाव्यात तसेच पालिकेचे कर्मचारी जेव्हा आपल्या घरी येतील त्यांना काहीही न लपविता माहिती द्यावी. नगरसेवकांनी नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांबरोबर समक्ष हजर राहून प्रभागातील नागरिकांची कोरोना व्हायरस संबंधी जनजागृती करावी असे त्यांनी आवाहन केले होते.
दरम्यान पंढरपूर पालिकेचे 86 कर्मचारी स्थानिक नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह शहरातील सतरा प्रभागात फिरून जनजागृती करत आहेत तसेच परगावहून आलेल्यांचे सर्व्हेक्षण होत आहे. शहरामध्ये अग्निशामक पाण्याच्या टँकरद्वारे व 4 ब्लोअर मशीन व 15 हातपंपाद्वारे निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आली आहे. शहरातील किरणा व औषध दुकाने येथे गर्दी होवू नये म्हणून प्रत्येक दुकानासमोर ग्राहकांमध्ये अंतर राहण्याच्या दृष्टीने प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांच्या सूचनेनुसार चुन्याने चौकोन आखण्यात आले आहेत. तसेच भाजी मंडईमध्ये विशेषत: भादुले हौदाजवळ होणारी गर्दी टाळण्यासाठी कोणत्याही भाजी व फळ विक्रेत्याला एका ठिकाणी बसू न देता हातगाडी द्वारे प्रत्येक गल्लोगल्ली जावून माल विक्री करण्यास सांगितले जात आहे. भाजी व फळ विक्रेत्यांना ओळखपत्रे देण्यात आली आहेत.
नगरसेवक संजय निंबाळकर, इरफान उर्फ सनी मुजावर व नवनाथ रानगट यांनी त्यांच्या शेतातील स्वत:च्या फवारणी ब्लोअर आणून आपआपल्या प्रभागातील फवारणी स्वत: उभारुन करुन घेतली आहे. तसेच शहरामध्ये बेघर (भिकारी) मोठ्या प्रमाणात असून सुमारे 80 बेघरांना नगरपरिषदेच्या निवारा केंद्रात राहण्याची व व जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. शहरातील सर्व्हेचे काम पूर्ण होताच ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तिला सर्दी, ताप, खोकला असेल त्यांच्यावर विशेष पथकाद्वारे 14 दिवस लक्ष ठेवण्यात येणार आहे. जनजागृतीच्या दृष्टीने शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये मोठे डिजिटल बोर्ड लावण्यात आलेले आहेत. तसेच कोरोना व्हायरस एखादा संशयित (सदृश) अथवा बाधित व्यक्ती आढळल्यास त्याच्यावर उपचार होण्याच्या दृष्टाने उपजिल्हा रुग्णालय यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे. कोणाला काही माहिती द्यावयाची असेल तर 18002331923 या नगरपरिषदेच्या टोल फ्री क्रमांकावर कळवावी असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच परदेश, परराज्य व परजिल्ह्यातून आलेल्यांनी जो फार्म भरून द्यावयाचा आहे त्यांची लिंक व्हॉट्सअ‍ॅपद्वारे शेअर करण्यात आलेली आहे. यावर माहिती तातडीने पालिकेला भरून द्यावी असे आवाहन नगराध्यक्ष साधना भोसले, मु्ख्याधिकारी अनिकेत मानोरकर तसेच सर्व सभापती, नगरसेवक – नगरसेविका यांनी केली आहे. या कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, नगरअभियंता नेताजी पवार, नगर रचनाकार अतुल केंद्रे, पाणीपुरवठा अभियंता आत्माराम जाधव, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!