कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी कडक निर्बंधाची अंमलबजावणी करा : मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी
*मंगल कार्यालय, कोचिंग क्लास, प्रवासी वाहनांवर राहणार वॉच*
सोलापूर दि. १९ : जिल्ह्यातील कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी पुन्हा एकदा निर्बंधाची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने लग्न समारंभ, कोचिंग क्लासेस, खासगी प्रवासी वाहने आणि खासगी दवाखान्यावर लक्ष ठेवले जाणार आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले.
कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख यांची आढावा बैठक नियोजन भवन येथे झाली. बैठकीला महापालिकेचे आयुक्त पि. शिवशंकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री. स्वामी यांनी सांगितले की, राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यातील कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध घालण्याची सूचना केली होती. त्यानुसार गर्दी होणाऱ्या ठिकाणी मंगल कार्यालय, कोचिंग क्लासेस, प्रवासी वाहने, खासगी दवाखाने यांच्यावर कडक लक्ष ठेवले जाणार आहे. मंगल कार्यालयात पन्नासहून अधिक ल़ोक आढळल्यास दहा हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. दुसऱ्यांदा पन्नासहून अधिक लोक आढळल्यास मंगल कार्यालय एक महिन्यासाठी सील केले जाईल. कोचिंग क्लासेस आणि शाळा येथे फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशनचा वापर केला जात असल्याची आरोग्य विभागाने तपासणी करावी. परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे.
आयुक्त श्री. शिवशंकर यांनी शहरातील अनेक खासगी डॉक्टर सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असणाऱ्या पेशंटची तपासणी करुन औषधे देतात पण त्यांची कोरोना चाचणी केली जात नाही. असे करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई केली जाणार आहे. शहरातील मंगल कार्यालयात तपासणी केली जाणार आहे. हॉटेलमध्येही क्षमतेपेक्षा जास्त लोक आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नव्या सूचनांनुसार एक रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील वीस जणांची चाचणी घेतली जाणार आहे. गरज भासल्यास कंटेनमेंट झोन केले जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून कोविड केअर सेंटरची पुन्हा एकदा तयारी केली जात आहे, कोणत्या प्रकारच्या औषधांचा खप वाढत आहे आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देणाऱ्या दुकानांवर कारवाई केली जाणार असल्याचे श्री. वाघमारे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, मुख्य वित्त आणि लेखाधिकारी अजय पवार, उपायुक्त धनराज पांडे, लसीकरण प्रमुख डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. इरफान सय्यद श्री सवामी समथँ अननछत्र मंडलाचे उपाध्यक्ष अभय खोबरे,सचिव शामकाका मोरे,विश्वसत संतोष भोसले आदी उपस्थित होते.